सांगली : मोठ्या शहरांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढेल तशी एसटीच्या प्रवाशांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. पुणे, मुंबई, अैारंगाबाद, नाशिक मार्गांवरील एसटीच्या अनेक गाड्या मोजक्याच प्रवाशांसह धावत आहेत. याचा मोठा फटका एसटीला बसत आहे.
लॉकडाऊन शिथिल होताच प्रवासी पुन्हा मिळविण्यासाठी एसटीला खूपच मोठी कसरत करावी लागली. लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रवासी मिळाले, पण स्थानिक फेऱ्यांना अजूनही पुरेसे प्रवासी नाहीत. सर्रास गाड्यांचे भारमान पन्नास टक्क्यांपर्यंतच आहे. आता कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने एसटीवर संकटाचे ढग घोंगावू लागले आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांना याचा मोठा परिणाम जाणवत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, अैारंगाबाद, सोलापूर, लातूर, मंडणगड, बीड आदी गाड्यांमध्ये मोजकेच प्रवासी दिसू लागले आहेत. प्रत्येक स्थानकावर चार-दोन प्रवासी घेत गाड्या पुढे धावताहेत. पुण्यानंतर पुढे तर अनेकदा गाडी मोकळीच राहत असल्याचा चालक-वाहकांचा अनुभव आहे.
लॉकडाऊननंतर महिन्याभरापासून एसटीला प्रवासी मिळत होते, तेदेखील आता कमी झाल्याचे एसटी अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवशाही गाड्यादेखील वीस ते तीस टक्के प्रवाशांसह धावत आहेत. प्रवाशांच्या मनात लॉकडाऊनची भीती आहे. शहरात गेल्यानंतर अचानक लॉकडाऊन जाहीर झाले, तर तेथेत अडकून पडण्याची धास्ती आहे, त्यामुळेदेखील प्रवासी लांब पल्ल्याचा प्रवास टाळत आहेत.
चौकट
कोरोनाचा फैलाव नव्याने सुरू झालेला असतानाही प्रवाशांमध्ये गांभीर्य नसल्याचे ढळढळीतपणे दिसत आहे. एसटीमध्ये सर्रास प्रवासी मास्क वापरत नाहीत. एका आसनावर एकाच प्रवाशाचा नियम असतानाही दोघे-दोघे बसलेले दिसतात. अनेकदा चालक-वाहकदेखील विनामास्क ड्युटी करताना दिसत आहेत. एसटीमध्ये सॅनिटायझरचा वापर नाममात्रच उरला आहे.
चौकट
अैारंगाबाद, बीडसह पुणे, मुंबई निम्म्यावर
- अैारंगाबाद, बीड, पुण्यासह मुंबईच्या फेऱ्या निम्म्यावर आल्या आहेत. ‘शिवशाही’देखील निम्म्याच संख्येने धावत आहेत.
- मिरज आगारातून परभणीसाठी नव्याने सोडलेली फेरी अंबेजाेगाईमधूनच परत फिरविण्यात आली. बीड, माजलगावच्या गाड्याही रद्द झाल्या आहेत.
चौकट
- कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर नाकेबंदी
कर्नाटक शासनाने सीमांवर नाकेबंदी सुरू केली आहे. प्रवाशांची तपासणी करून सोडले जात आहे. प्रसंगी कोरोनाविषयक प्रमाणपत्रही मागितले जात आहे. मिरज-कागवाडदरम्यान रविवारी चेकपोस्ट सुरू झाले. त्याचा परिणाम एसटी वाहतुकीवर झाला.
- कर्नाटकातून रविवारी दिवसभरात दोन ते तीन एसटीच आल्या. महाराष्ट्रातूनही शनिवारपासून मोजक्याच गाड्या कर्नाटकात धावल्या.
पॉईंटर्स
- जिल्ह्यात एसटीने रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या - २०००००
- लॉकडाऊन खुले केल्यानंतरची संख्या - १२५०००
- एसटीने सध्या प्रवास करणाऱ्यांची संख्या - ७५०००