अविनाश कोळी
सांगली : ओमायक्रॉनचे देशातील रुग्ण वाढत असल्याने त्याचा परिणाम सांगलीतील व्यापारावर दिसून येत आहे. भविष्यातील लॉकडाऊनची परिस्थिती काय असेल याची कल्पना नसल्याने उत्पादक, घाऊक व्यापारी व स्थानिक व्यापाऱ्यांनी उधारी बंद केली आहे. उधारी बंदमुळे मालाची आवकही कमी प्रमाणात केली जात आहे.
सांगलीत धान्य, कापड, सौंदर्यप्रसाधने, शेतीमालाची मोठी उलाढाल दरवर्षी होत असते. गेल्या दीड वर्षात येथील व्यापाऱ्यांना कोरोनामुळे मोठा फटका बसला. मालाचा साठा शिल्लक राहिल्यानेही नुकसान सोसावे लागले. मुंबई, कलकत्ता, इंदौर, अहमदाबाद, अमरावती, दिल्ली या मोठ्या शहरांमधून सांगलीत विविध प्रकारच्या मालाची आवक होते. येथील उत्पादक व घाऊक व्यापाऱ्यांनी सांगलीतील व्यापाऱ्यांना उधारीवर माल देणे बंद केले आहे. त्यामुळे सांगलीतील व्यापाऱ्यांनी ग्रामीण भागातील छोट्या दुकानदारांना व ग्राहकांना उधारीवर माल देणे बंद केले आहे.
लॉकडाऊनबाबत सर्वाधिक भीती
कोरोना काळात सतत लॉकडाऊनमुळे व्यापार बंद पडतो. त्यामुळे बाजारात गुंतवलेले पैसे अडकतात. उत्पादकांपासून स्थानिक व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना पैसे अडकण्याची भीती वाटत आहे. यापूर्वी तसा अनुभव घेतल्याने सर्वजण सतर्क झाले आहेत.
मालाची आवक घटल्याचे चित्र
सांगलीतील व्यापारी सहा महिने, वर्षभर पुरेल एवढा मालाचा साठा करत. उधारीवर माल मिळत असल्याने व्यापार होईल त्या प्रमाणात उत्पादक किंवा घाऊक व्यापाऱ्यांचे पैसे भागवले जात होते. आता पुढील महिन्यात काय होईल याचा अंदाज नसल्याने महिनाभर पुरेल इतकाच माल आणण्याकडे व्यापाऱ्यांचा कल आहे.
कापड व्यवसायात कोरोना काळात मुंबई, कलकत्ता, अमरावती, दिल्ली या भागातून क्रेडिटवर माल मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे सांगलीतील व्यापारी कमी माल खरेदी करीत आहेत. भविष्यात लॉकडाऊन लागणार की नाही, याची कल्पना नाही. प्रशासन कधीच स्पष्ट सांगत नाही. त्यामुळे व्यापारी अधिक काळजीपूर्वक पावले टाकत आहेत. - श्यामसुंदर पारीख, अध्यक्ष, रेडिमेड गारमेंट असोसिएशन
तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे मालाची आवक कमी केली आहे. देशांतर्गत उत्पादक व घाऊक व्यापाऱ्यांनी उधारीवर माल देणे बंद केले आहे. शासनाकडून कोणताही आधार व्यापाऱ्यांना नसल्याने व्यापारी कोणतीही जोखीम स्वीकारण्यास तयार नाहीत. बेभरवशाच्या स्थितीमुळे व्यापारी धास्तावले आहेत. - युसूफ तांबोळी, व्यापारी, गणपती पेठ