लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. शुक्रवारी चौकाचौकात पोलिसांचा फौजफाटा कार्यरत असूनही अकारण फिरणाऱ्यांच्या संख्येत बेसुमार वाढ होत असल्याचे दिसून आले. इस्लामपूर शहरासह तालुक्यातील नागरिकांना कोरोनाची भीती राहिली नसल्याचे चित्र आहे.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जारी करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना परवानगी आहे. याचा फायदा उठवत नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत आहेत. दुचाकीस्वारांची संख्या मोठी आहे. आचारसंहितेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आष्टा नाका, तहसीलदार कचेरी चौक, शिराळा नाका परिसर आणि ताकारी रोडवर पोलिसांचा फौजफाटा कार्यरत आहे. पोलीस जुजबी कारवाई करत असल्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर वचक राहिोला नाही. चौक वगळता इतर रस्त्यांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याचे दिसून आले.
दुसऱ्या दिवशीही इस्लामपूर एसटी आगारातून लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. प्रवासी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी नसल्याने ग्रामीण भागातील सर्व फेऱ्या रद्द केल्या. त्यामुळे इस्लामपूर शहरात येणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या मोठी आहे. पोलिसांकडून विचारणा झाली असता विविध कारणे देऊन दुचाकीस्वार चकवा देत आहेत. त्यामुळे शहरातील मुख्य चौक वगळता इतरत्र रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. कोरोनाला थोपवायचे असेल तर पहिल्या लाटेवेळी जी कारवाई होत होती, अशीच कारवाई आता होणे अपेक्षित असल्याचे सुजाण नागरिक सांगतात.
कोट
गेल्या तीन महिन्यांपासून सात हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. रोज तीनशेच्या घरात लसीकरण होते. कोरोनाचे रूग्णही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. लसीचा पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे लसीकरणासाठी येणाऱ्यांना लसीच्या प्रतीक्षेत थांबावे लागत आहे.
- डॉ. नरसिंह देशमुख, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय
कोट
इस्लामपूर शहरात साठहून अधिक कर्मचारी विविध चौक, रस्त्यावर विनाकारण फिरणारे, विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. परंतु शंभर टक्के लॉकडाऊन नसल्याने विविध कारणे देऊन नागरिक फिरत आहेत. त्यातूनही पोलीस कारवाई करतात.
- नारायण देशमुख, पोलीस निरीक्षक, इस्लामपूर