सांगली : पलूसमध्ये एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत दिलेल्या पोषण आहारात मृत साप सापडल्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत बुधवारी प्राथमिक चौकशी करण्यात आली. चौकशी अहवाल महिला बालकल्याण आयुक्तांकडे पाठविला आहे. तालुक्यात पोषण आहार ठेवलेले गोदाम सील केले असून, अन्न औषध प्रशासनाने आहाराचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांनी दिली.शासनाकडून एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता तसेच सहा महिने ते तीन वर्षे बालकांना पोषण आहार पुरवला जातो. गेल्या चार महिन्यांपासून आहारात बदल केला आहे. पलूस कृषीनगर अंगणवाडी क्रमांक ११६ येथून येथील लाभार्थी सुभाष निवृत्ती जाधव यांनी आपले नातू शिरीष याच्यासाठी आहार घरी नेला होता. तो पॅकिंग फोडला असता त्या पिशवीत चक्क लहान आकाराचा मृत अवस्थेतील वाळा साप आढळला होता. या प्रकरणाची विधिमंडळाच्या अधिवेशनात पलूस-कडेगावचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी आवाज उठविला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांच्यासह अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी थेट पलूसमध्ये जाऊन चौकशी केली. लाभार्थ्यांकडून माहिती घेतली. घरातील पोषण आहाराची पाहणी केली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी नमुने ताब्यात घेतले. ते नमुने शासकीय प्रयोगशाळेत पाठविले आहे. पोषण आहारात आढळलेले वाळा सापाचे पिल्लू ज्याठिकाणी फेकले होते, ते मिळालेच नाही. अंगणवाडी क्रमांक ११६ मध्ये शिल्लक असलेला पोषण आहाराचा साठा सील केला आहे. या प्रकरणाचा प्राथमिक चौकशी अहवाल महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्तांना पाठविला आहे. आहार नमुन्याचा अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
साप आढळलाच नाहीपलूसमधील अंगणवाडी क्रमांक ११६ मध्ये देण्यात आलेल्या पोषण आहारात आढळून आलेला वाळा साप लाभार्थ्याने फेकून दिला होता. चौकशी अधिकाऱ्यांना पोषण आहारात आढळलेल्या वाळा सापाचे पिल्लू आढळून आले नाही, ते ज्याठिकाणी फेकले होते, तेथेही जाऊन पाहणी केली. परंतु तिथेही साप आढळून आला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय संबंधित अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांनाही साप पाहायला मिळाला नाही, असे चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितले.