इस्लामपूर : वाळवा तालुक्याला बुधवारी रात्री झालेल्या मान्सूनच्या पहिल्याच पावसाने झोडपून काढले. या पहिल्याच पावसाची नोंद ११०.३ मि.मी. झाली. अतिवृष्टीचा हा पाऊस झाला असला तरी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा पाऊस पेरणी झालेल्या आणि होणाऱ्या खरीप पिकासाठी पोषक ठरणार असल्याचे सांगण्यात आले. तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने यांनी या पावसामुळे पेरणी झालेल्या पिकाचे नुकसान होणार नसल्याची माहिती दिली.
वाळवा तालुक्यात या खरीप हंगामात १४०३ हेक्टरवर भात, खरीप ज्वारी, मका या तृण धान्य पिकाची पेरणी झाली आहे. एकूण क्षेत्राच्या ३१ टक्के इतकी ही पेरणी झाली आहे. तूर, मूग, उडीद या कडधान्यांची फक्त २६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे, तर भुईमूग २ हजार ४६३ हेक्टर आणि सोयाबीन सहा हजार २२ हेक्टर या क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आले ४९ हेक्टर, हळद ३५० हेक्टर, भाजीपाला २१४ हेक्टर अशी मसाला पिके ६१३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आडसाली उसाची ५ हजार ५४५ हेक्टरवर लागण झाली आहे. यापूर्वी झालेला पाऊस हा शेतजमिनीमध्ये ओलावा निर्माण करण्याइतपतच झाला होता. या पावसाचे पाणी जमिनीत पूर्णपणे शोषले जाणार आहे. तसेच उताराच्या बाजूने त्याचा निचराही होणार आहे. त्यामुळे पिके पाण्यात राहून कुुजण्याचा अथवा त्याचे नुकसान होण्याचा कोणताही धोका संभावत नाही. उलट हा पाऊस खरीप हंगामासाठी पोषणकच ठरणार असल्याचे कृषी अधिकारी माने यांनी स्पष्ट केले.