कामेरी : कामेरी (ता. वाळवा) केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत निकृष्ट दर्जाच्या डाळींचा पुरवठा केला जात आहे शाळा व बचत गटांकडून अशा डाळी घेण्यास नकार दिल्याने त्यांना ठेकेदारांकडून परत केलेली डाळ पुन्हा वेळेत न दिली गेल्याने विद्यार्थ्यांना पोषण आहार देणे अवघड होत आहे. तरी तालुका शिक्षण विभागाने ठेकेदाराशी संपर्क साधून त्वरित चांगल्या दर्जाच्या डाळीचा पुरवठा केला जावा, अशी मागणी शाळा व बचत गटांकडून होत आहे.शालेय पोषण आहार योजनेच्या साप्ताहिक आहार वाटप नियोजनानुसार तूरडाळ, हरभरा, वाटाणा, मूगडाळ या कडधान्यांचा ठरलेल्या दिवशी वापर करावा लागतो. मात्र डिसेंबरमध्ये आलेली निकृष्ट दर्जाची मूगडाळ कामेरी केंद्रातील शाळांनी घेण्यास नकार दिला व ती डाळ परत केली.या घटनेला ३ आठवडे होऊनही ठेकेदाराकडून अद्याप डाळ दिली न गेल्याने त्याऐवजी इतर कडधान्ये वापरल्यास विद्यार्थ्यांना महिन्याअखेरचे काही दिवस पोषण आहारापासून वंचित राहावे लागणार आहे. तसेच ठेकेदाराकडून दिला जाणारा तांदूळ चांगला असला तरी त्याच्या पोत्याचे वजन ५0 किलो भरत नाही ते ४२ ते ४८ किलोच भरते. वजनाच्या फरकातील तांदूळ देण्यासही ठेकेदाराकडून टाळाटाळ केली जाते. त्यामुळे कमी येणाऱ्या तांदळाचा ताळमेळ घालणे बचत गट व शाळांना अवघड होत आहे. तरी कामेरी केंद्रातील शाळांनी परत केलेली मूगडाळ ठेकेदाराने तात्काळ द्यावी, यासाठी तालुका शिक्षण विभागाने पाठपुरावा करावा, अशी मागणी पालकांमधून होत आहे. (वार्ताहर)
पोषण आहारांतर्गत शाळांना निकृष्ट डाळ
By admin | Published: January 04, 2015 11:45 PM