सांगली : हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, म्हणून आम्ही हरकत घेतली आहे. या हरकतीवर सुनावणी कधी घेणार आहे, असा सवाल मिरज प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केला आहे. तातडीने सुनावणी घेण्याची विनंतीही शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी प्रांताधिकारी यांच्याकडे केली. दरम्यान, सक्तीच्या भूसंपादनाचा दि. २८ फेब्रुवारीला १९ गावांमध्ये शेतकरी काळ दिवस पाळणार असून, घरावर काळ्या गुड्या उभारणार आहे, असेही शेकापचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी सांगितले.दिगंबर कांबळे म्हणाले, नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गला सांगली जिल्ह्यातील १९ गावातून तीव्र विरोध आहे. द्राक्ष, डाळिंब, ऊस मोठ्या प्रमाणात बागायती शेती उद्ध्वस्त होणार आहे. तसेच हा महामार्ग नदीकाठावरील गावातून जात असल्याने प्रचंड पुराचा धोका वाढणार आहे. अनेक गावांना स्थलांतर होण्याचा धोका निर्माण होणार आहे. कुणाचीही मागणी नसलेला हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन, बेरोजगार करणारा रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणारा एकाही शेतकऱ्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा नसलेला हा शक्तिपीठ महामार्ग कुणासाठी केला जातोय, हे सरकारने जाहीर करावे.शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, याबाबत घेतलेल्या हरकतीवर प्रशासनाने तातडीने सुनावणी घेण्याचीही त्यांनी मागणी केली. शक्तिपीठ महामार्गासाठी गेल्या वर्षी २८ फेब्रुवारी रोजी काढलेली सक्तीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द झालीच पाहिजे. शेतकरी हिताच्या तरतुदी असलेल्या मूळच्या २०१३ भूमी अधिग्रहण कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी आहे.यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते, नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे, राज्य संपर्क प्रमुख शरद पवार, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, गजानन पाटील, विष्णू सावंत, जिल्हा उपाध्यक्ष राहुल जमदाडे, सुभाष जमदाडे, शिवाजी शिंदे, प्रकाश टकले, पांडुरंग पवळ, रमेश कांबळे व इतर शेतकरी उपस्थित होते.
२३ मार्चला शेतकरी रस्त्यावर उतरणारराज्य सरकारने शक्तिपीठ महामार्ग रद्दबाबतचे शासकीय परिपत्रक २३ मार्चपूर्वी काढले पाहिजे. शासनाने २३ मार्चपर्यंत काहीच निर्णय घेतला नाही तर शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिगंबर कांबळे यांनी दिला.