सांगली : जिल्ह्यातील कोविड रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याबाबत महापालिकेकडून पाच एजन्सीची शिफारस करण्यात आली आहे. त्यातील दोन एजन्सी शासनमान्य यादीवर नाहीत. त्यामुळे चुकीचे ऑडिट होऊन भविष्यात भंडारा, विरारसारख्या दुर्घटना घडू शकतात, असा आक्षेप सामाजिक कार्यकर्ते आयुब पटेल यांनी घेतला.
याबाबत पटेल यांनी आयुक्त, उपायुक्तांनाही निवेदन दिले आहे. पटेल म्हणाले की, विरार येथील आगीच्या दुर्घटनेनंतर पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर महापालिकेच्यावतीने पाच एजन्सींची नावे जाहीर करण्यात आली. या एजन्सीकडून फायर ऑडिट करून घेण्याची शिफारसही करण्यात आली आहे. त्यापैकी दोन एजन्सी या शासनाच्या यादीवरील नाहीत. त्यामुळे त्यांना फायर ऑडिटचे काम करता येणार नाही. त्यांच्याकडून चुकीचे फायर ऑडिट झाल्यास भंडारा, नागपूर, विरारसारख्या दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शासन यादीत नसलेल्या एजन्सीची शिफारस केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी, तसेच या एजन्सींना फायर ऑडिटपासून रोखावे, अशी मागणी आयुक्तांकडे केल्याचेही त्यांनी सांगितले.