सांगली : महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये, यासाठी कोण प्रयत्नशील आहे, याची जाणीव सर्वांना आहे. मी आताच बोलणं योग्य होणार नाही, योग्य वेळी महाविकास आघाडीतील तो नेता कोण? हे जाहीर करण्यात येईल, असा टोला काँग्रेस नेते माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सोमवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत लगावला, पण महाविकास आघाडीतील तो नेता कोण, याची जिल्ह्यात उलटसुलट चर्चा रंगली आहे.डॉ. विश्वजित कदम म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तरीही सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये यासाठी काही नेते प्रयत्न करीत आहेत, हे सर्वांना माहीत आहे. यामागे कोणत्या प्रकाराचे राजकारण शिजतंय, कोण शिजवतंय याबाबत काही लोकांना माहीत आहे, काहींना माहिती नाही. मात्र, मी त्याबाबत आता स्पष्ट बोलू शकत नाही, योग्यवेळी त्याबाबत बोलणार आहे.सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळेल. आम्ही सर्वांनी एकमताने विशाल पाटील यांची लोकसभेसाठी उमेदवारी ठरवली आहे. तसा निर्णय एकमताने पक्षश्रेष्ठींना कळविला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीसुद्धा सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील, असा शब्द दिला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पक्ष वाढविण्याचा प्रत्येकाला अधिकारचंद्रहार पाटील यांच्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतील प्रवेशाबद्दल विचारले असता. डॉ. कदम म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपआपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. पक्षात कोणाला घ्यावे, कोणाला घेऊ नये, हा ज्यांचा त्याचा निर्णय आहे. अद्याप सांगली लोकसभेच्या उमेदवारीबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे सर्व आदेश दिल्लीवरूनमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे सर्व आदेश सध्या दिल्लीवरून येत आहेत. गावांना पाणी देण्यासाठी आता दिल्लीला विचारणार आहे का ? असा खडा सवाल डॉ. विश्वजित कदम यांनी राज्य सरकारला उपस्थित केला. महाराष्ट्रातील पोलिस भरतीदेखील दिल्लीकरांना विचारल्याशिवाय होणार नाही, अशी परिस्थिती आहे, पण पाण्याबाबतीत दिल्लीला विचारू नका, असेही त्यांनी राज्य सरकारला सुनावले.