लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धूमशान सुरू झाले असताना, लढतींचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना यांच्या महाविकास आघाडीच्या प्रयोगाची अजून चर्चाच सुरू असून, स्थानिक पातळीवरील राजकारणाचे रंग वेगळे असल्याने महाविकास आघाडीच्या प्रयोगासमोर अडथळे निर्माण झाले आहेत. दुसरीकडे भाजपने ‘एकला चलो रे’चा नारा देत तयारी सुरू केली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. त्यामुळे जिल्ह्यात होत असलेल्या १५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही हा प्रयोग व्हावा, अशी जिल्ह्यातील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. एकीकडे याबाबत चर्चा सुरू असताना, गावपातळीवरचे राजकारण हे पक्षापेक्षा गटांमध्ये विभागले गेल्याने त्याठिकाणी हा प्रयोग करताना अनेक अडचणी येणार आहेत. त्यामुळे यापूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असतानाही ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक नेत्यांवरच सर्व निर्णय सोपविले होते. या निवडणुकांमध्येही तशीच शक्यता दिसत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये अनेक ठिकाणी पॅनेल, गटा-तटांच्या रंगात निवडणूक रंगलेली पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी व भाजपची ग्रामपंचायतीत ताकद अधिक आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचा दबदबा
जिल्हा परिषदेत सध्या भाजप सत्तास्थानी आहे. जिल्ह्यातील पंचायत समित्या व ग्रामपंचायतींचा विचार केल्यास तालुकानिहाय परिस्थिती वेगळी आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी राष्ट्रवादी, तर काही ठिकाणी भाजपची ताकद अधिक आहे. काँग्रेसही काही ठिकाणी वरचढ असून, खानापूर तालुक्यात शिवसेनेचे प्राबल्य आहे.
महाविकास आघाडी व्हावी, ही नेत्यांची इच्छा
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे महाविकास आघाडीबाबत अनुकूलता दर्शविली आहे, मात्र गावपातळीवरील नेत्यांमध्ये यावरून मतभेद आहेत. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांना महाविकास आघाडीचा प्रस्ताव अद्याप पचनी पडला नाही.
तिन्ही पक्ष एकत्र लढणार का?
काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांनी अद्याप याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले. निवडणूक तोंडावर असताना निर्णय होऊ शकलेला नसल्याने अशाप्रकारची महाविकास आघाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत दिसण्याची शक्यता धूसर दिसत आहे.
लढल्यास काय परिणाम?
महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास फायदा होण्याची शक्यता आहे. तासगाव, कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी, खानापूरमध्ये शिवसेना, पलूस, कडेगाव व मिरजेत काँग्रेसची ताकद एकवटल्यास त्याचा फायदा आघाडीला होऊ शकतो. वेगळे लढल्यास मतांची विभागणी होऊ शकते.