सांगली : शहरातील जामवाडी परिसरात थकीत वीजबिलापोटी कनेक्शन तोडल्याच्या विरोधात महावितरण कार्यालयात येऊन आंदोलनाची धमकी देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुब पटेल (रा. सांगली) असे कार्यकर्त्याचे नाव असून सहायक अभियंता दीपाली सुरेश देशमुख यांनी शहर पोलिसांत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पटेल याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
थकीत वीजबिलापोटी कनेक्शन तोडण्याची कारवाई महावितरणकडून सध्या सुरू आहे. त्यात जामवाडी येथील कनेक्शन तोडण्यासाठी महावितरणचे कर्मचारी दोन दिवसांपूर्वी गेल्यानंतर पटेल यांनी त्यांना कारवाई करण्यापासून रोखले होते. शुक्रवारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके व सहायक अभियंता दीपाली देशमुख कार्यालयात असताना पटेल व त्यांचे एक सहकारी तिथे आले व ते रागात बोलले. याशिवाय त्यांनी कोरोनाविषयक नियमांचेही पालन केले नव्हते, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार देशमुख यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
चौकट
चुकीच्या माहितीवर गुन्हा
सामाजिक कार्यकर्ते आयुब पटेल यांनी सांगितले की, जामवाडी परिसरात वीज कनेक्शन तोडू नये म्हणून कर्मचारी गैरप्रकार करत होते. ही बाब मी उघडकीस आणल्याच्या रागातून अधिकाऱ्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे.