लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा येथील दत्त वसाहत, गांधीनगर, साईनगरमधील गट क्रमांक ४, ६, ९ मधील जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार मागील अनेक वर्षांपासून होत नाहीत. जुन्या नियमांचा याला अडथळा ठरत आहे. नवीन वर्षात तरी पालकमंत्री जयंत पाटील यांनी लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.
येथील दत्त वसाहत, गांधीनगर व साईनगरमधील नागरिकांनी संबंधित मालकांकडून प्लॉटची खरेदी केली. काही प्लॉटधारकांच्या नावावर नोंद झाली आहे; तर काहींच्या अद्याप झालेली नाही. काही नागरिकांनी प्लॉट घेऊन नियमितीकरण, एन. ए. केले. या प्लॉट धारकांच्या नावे सात-बाराही झालेला आहे. पालिकेने बांधकाम परवानगी दिली आहे. लोकांनी घरेही बांधली. या नागरिकांना पालिकेच्या वतीने वीज, पाणी नियमित मिळत आहे. घरपट्टी, पाणीपट्टी नागरिक भरत आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून जुन्या अटी व शर्ती व तुकडेबंदीचा भंग केल्याच्या कारणावरून या परिसरातील नागरिकांचे प्लॉट खरेदी-विक्री व्यवहार होत नाहीत. बँकेकडून कर्जही उपलब्ध होत नाही. तसेच सात-बारावर वारसांची नावेही नोंद होत नाहीत. त्यामुळे अनेक नागरिकांना प्लॉट असून अडचण, नसून खोळंबा अशी परिस्थिती झाली आहे..
चौकट
वर्षभरानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’
नागरिकांनी पालकमंत्री जयंत पाटील यांची गतवर्षी भेट घेतली होती. यानंतर परिसरातील प्रमुख नागरिकांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बैठकही झाली. मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न लवकर मार्गी लावण्याबाबत सूचना केली. मात्र वर्ष संपत आले तरी याबाबत अद्याप हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे नूतन वर्षात तरी दत्त वसाहत, गांधीनगर, साईनगरच्या नागरिकांचा प्रश्न सुटणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.