ओळ : शिराळा येथील शिव भाेजन थाळी केंद्रावर आज हनुमान जयंतीनिमित्त लाभार्थ्यांना गव्हाच्या खिरीचे वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त माजी नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के यांच्याहस्ते शिवभोजन थाळीसाेबत नागरिकांना खीर वाटप करण्यात आले. पुरवठा अधिकारी व्ही. डी. बुरसे यावेळी प्रमुख उपस्थित होते. सोनटक्के म्हणाल्या, या अगोदर दसरा सणानिमित्त पुरणपोळीचा आस्वाद सर्वांना देण्यात आला होता. त्याचबरोबर, दिवाळीला फराळ, रामनवमीनिमित्त खिरीचा प्रसाद देण्यात आला. शासनाने गरीब व गरजू लोकांसाठी ज्या हेतूने ही शिवभोजन थाळी चालू केली. ती खरच खूप गरजेची आहे व त्याचा लाभ या लोकांना देताना, त्यांच्या चेहऱ्यावर जो भाव दिसतो, ताे अनमाेल आहे. या अगोदर दानशूर मंडळींना विनंती करून, यापूर्वीचे प्रत्येक थाळी मागे येणारे ५ रुपये हे शुल्क दररोज दिवस ठरवून देऊन जितक्या थाळी होतील, त्याप्रमाणे घेत होतो. या सत्रात तर शासनाने मोफतच शिवभोजन थाळी देऊ केली आहे. लाभार्थ्यांना जेवणामध्ये दूजाभाव न करता, आम्ही आमचे घरचे सदस्य मानूनच हे काम एक सेवा म्हणून करत आहोत. याकरिता अनेकांचे सहकार्य लाभले आहे.
यावेळी केंद्र चालक आशा साळुंखे, सुनंदा म्हेत्रे यांचेसह सर्व शिवभोजन लाभार्थी उपस्थित होते.