विधानसभेच्या निमित्ताने पुन्हा कॉँग्रेसअंतर्गत गटबाजीस धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 03:20 PM2019-09-25T15:20:02+5:302019-09-25T15:20:59+5:30
लोकसभा निवडणुकीत अनुभवास आलेली कॉँग्रेसमधील गटबाजी विधानसभा निवडणुकीतही कायम आहे. दोन वेगवेगळे गट दोन वेगवेगळ्या उमेदवारांना तिकीट मिळावे म्हणून कार्यरत आहेत. मदनभाऊ पाटील गटाने मेळावा घेऊन स्वतंत्र चूल मांडली आहे.
सांगली : लोकसभा निवडणुकीत अनुभवास आलेली कॉँग्रेसमधील गटबाजी विधानसभा निवडणुकीतही कायम आहे. दोन वेगवेगळे गट दोन वेगवेगळ्या उमेदवारांना तिकीट मिळावे म्हणून कार्यरत आहेत. मदनभाऊ पाटील गटाने मेळावा घेऊन स्वतंत्र चूल मांडली आहे.
एकीकडे कॉँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे सूर जुळत असताना, कॉँग्रेसअंतर्गत गटबाजीने तोंड वर काढले आहे. लोकसभा निवडणुकीत अशाच भांडणातून सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेली होती.
एकत्रित येऊन कॉँग्रेसचे नेते कोणताही निर्णय घेत नसल्याने पक्षाशी प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था वाढली आहे. दीड महिन्यापूर्वी कॉँग्रेस भवनात झालेल्या बैठकीत दादा गटातील काही कार्यकर्त्यांनी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर वातावरण शांत होते, मात्र गटबाजी धुमसतच होती.
पृथ्वीराज पाटील यांच्या समर्थकांनी उमेदवारीसाठी तसेच निवडणुकीच्या तयारीसाठी प्रयत्न चालविले असताना, मंगळवारी मदन पाटील यांच्या समर्थकांनी जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारीसाठी मेळावा घेतला.
या मेळाव्याला पृथ्वीराज पाटील यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. उमेदवारीची मागणी करणे किंवा त्यासाठी बैठका घेणे यात गैर काही नसले तरी, तिकीट न मिळाल्यास प्रत्येकवेळी कॉँग्रेसमधील एखादा गट नाराज होत असतो. कोणालाही उमेदवारी मिळाल्यास त्यांचा प्रचार करू, असे पृथ्वीराज पाटील यांनी स्पष्ट केले आहे, मात्र मदनभाऊ पाटील गटाने स्वतंत्र चूल मांडली आहे.
सर्वांना सोबत घेऊन एकसंधपणे लढण्यासाठी त्या गटाची मानसिकता दिसत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीनेही अनेकदा गटबाजी संपविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आलेले नाही.