सांगली : जिल्हा परिषद पदाधिकारी बदलासाठी भाजपच्या बारा सदस्यांनी बंड केल्यामुळे पक्षातील नेते खडबडून जागे झाले आहेत. भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी सदस्यांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यापर्यंत पोहोचविली आहे. दुसऱ्या बाजूला बदलासाठी आक्रमक असलेल्या दुसºया गटाचे नेते गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यामुळे पदाधिकारी बदलाचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्याचे दिसून येत आहे.भाजपमधील नेत्यांच्या कलहामुळे जिल्हा परिषदेत २५ सदस्यांमध्ये चार गट पडले आहेत. प्रत्येक गटाची भूमिका वेगळी आहे. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती अरुण राजमाने, तम्मणगौडा रवी-पाटील, ब्रम्हानंद पडळकर, प्रा. डॉ. सुषमा नायकवडी यांनी सांगितले की, नेत्यांनी आदेश दिल्यानंतर आम्ही राजीनामे देण्यास तयार आहोत; सदस्य म्हणतात म्हणून राजीनामे देणार नाही. या पदाधिकाºयांना काही सदस्यांनी समर्थन दिले आहे. या गटानेही बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पदाधिकाºयांचे कामकाज चांगले असल्यामुळे त्यांना अडीच वर्षे कायम ठेवण्याची मागणी केली आहे.दुसºया बाजूला पदाधिकारी बदलासाठी भाजपमधील बारा सदस्यांचा गट सक्रिय झाला आहे. त्या गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत भूमिका मांडली आहे. पदाधिकारी बदलाच्या बाजूचे समर्थन खासदार संजयकाका पाटील, आमदार विलासराव जगताप यांनी केले आहे. खा. पाटील गुरुवार, दि. ४ रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. इतर सदस्यांना संधी देण्यासाठी पदाधिकारी बदल करावा, अशी सदस्यांची मागणी आहे, याबाबत योग्य तोडगा काढण्याची भूमिका ते मांडणार आहेत. मुख्यमंत्र्यांकडे पदाधिकारी बदलाचा चेंडू गेल्यामुळे, ते कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे गणित लक्षात घेऊन पदाधिकारी बदलास मुख्यमंत्री ग्रीन सिग्नल देणार, की आताच्या टीमलाच अडीच वर्षे काम करण्याची संधी देणार, हे येत्या चार दिवसात स्पष्ट होणार आहे.वरिष्ठ नेते निर्णय घेतील : देशमुखजिल्हा परिषद पदाधिकारी बदल करण्याबाबत आमदार विलासराव जगताप यांनी माझ्याशी चर्चा केली होती. दोन दिवसांपूर्वी सदस्यांनीही पदाधिकारी बदलाची मागणी केली आहे. त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यापर्यंत सदस्य आणि जगताप यांची भूमिका पोहोचविली आहे. पदाधिकारी बदलाबद्दल पक्षाचे वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दिली.बदल केला तर, कारभार सुरळीत चालणार का? : अजितराव घोरपडेजिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल करण्यास आमची काहीच हरकत नाही. उलट आमच्या सदस्याला सभापतीची संधी मिळेल. पण, बदलानंतर जिल्हा परिषदेतील सर्व गटांना बरोबर घेऊन कारभार सुरळीत करण्याची धमक नवीन अध्यक्षामध्ये असण्याची गरज आहे. अन्यथा चांगल्या चाललेल्या कारभाराची घडी विस्कटण्याची भीतीही आहे, अशी प्रतिक्रिया विकास आघाडीचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी दिली.मुख्यमंत्र्यांकडे सदस्यांची भूमिका मांडणार : संजयकाका पाटीलजिल्हा परिषद पदाधिकारी बदल सव्वा वर्षानंतर करायचे निश्चित झाले होते. त्यानुसार सदस्यांनी आक्रमक मागणी केली आहे. या सदस्यांची मागणी गुरुवार, दि. ४ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडणार आहे. मुख्यमंत्री सदस्यांच्या मागणीचा योग्य तो विचार करतील, अशी प्रतिक्रिया खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
पदाधिकारी बदल मुख्यमंत्र्यांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 12:24 AM