मिरज : मिरजेत अत्याचारपीडित तरूणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडून सुरू असलेल्या चौकशीत काही पोलिस अधिकारी व कर्मचारी दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याची चर्चा आहे. पीडितेवर खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळत नसल्याने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात येत आहे. दि. ३ रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक सांगलीत येत असून ते या प्रकरणाचा आढावा घेणार आहेत. मिरजेत बलात्कारपीडित तरूणीवर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केल्याने तिने आत्महत्या केली. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी अमित कुरणे यास दीड महिना अटक करण्यात आली नसल्याने त्यास पोलिसांनी मदत केल्याचा पीडितेच्या नातेवाईकांचा आरोप आहे. पीडितेच्या आत्महत्येनंतर मात्र आरोपी अमित कुरणे व त्याच्या आई-वडिलांना अटक करून त्यांना सहआरोपी करण्यात आले आहे. पीडितेवर खंडणीचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षक सुवर्णा पत्की यांना निलंबित करण्यात आले असून अन्य पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय चौकशी करीत आहेत. आरोपी अमित याच्या मोबाईलवरील कॉल्सच्या नोंदीवरून, फरारी काळात काही पोलिस कर्मचाऱ्यांशी त्याचा संपर्क होता, असे निष्पन्न झाले आहे. पीडितेवर गुन्हा दाखल केल्याबाबत पोलिस अधिकारी व कर्मचारी परस्परांवर जबाबदारी ढकलत आहेत. या प्रकरणाशी संबंधित गांधी चौक पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याने या प्रकरणात गुंतलेला पोलिस कर्मचारी कोण? याबाबत गूढ कायम आहे. गणेशोत्सवानिमित्त विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील सांगली दौऱ्यावर येणार असून, ते या प्रकरणाचा व चौकशीचा आढावा घेणार असल्याची माहिती मिळाली. (वार्ताहर)
अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ठपका
By admin | Published: August 29, 2016 12:19 AM