मिरज : स्थायी समिती सभेत पदाधिकारी, सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मुरूम, ड्रेनेज दुरूस्तीची कामे करण्यास ठेकेदार तयार नसतील, तर महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत कामे करावीत, असा निर्णय झाला. नगरसेवक नागरिकांच्या संतापाला सामोरे जात असताना, प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका सभापती संतोष पाटील यांनी केली. पुढील सभेपर्यंत कामे सुरू करावीत अन्यथा अधिकाऱ्याला सभागृहाबाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा सदस्यांनी दिली.मिरज महापालिका कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सभापतींच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा पार पडली. उपायुक्त विजय पवार, नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्यासह सदस्य व अधिकारी उपस्थित होते. सुरूवातीस विश्रामबाग येथे सिध्दिविनायकपूरम येथील ड्रेनेज फुटून रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था केली नसल्याबद्दल शहर अभियंता आर. पी. जाधव यांचे प्रदीप पाटील यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी आर. पी. जाधव यांनी, बिले थकीत असल्याने ठेकेदार काम करण्यास तयार नसल्याचे सांगितल्याने, त्यांची सदस्यांसोबत वादावादी झाली. मुरूम टाकण्याबाबत तांत्रिक अडचण अधिकारी सांगत असल्याची तक्रार सदस्यांनी केली. यावर संतोष पाटील यांनी, थकीत बिले व तांत्रिक अडचणीचे कारण न सांगता प्रशासनाने तसलमात घेऊन पालिकेच्या बांधकाम विभागामार्फत कामे करावीत, नागरिक नगरसेवकांना लाखोली वाहत असताना प्रशासनाने बघ्याची भूमिका घेऊ नये, असे सुनावले. राजू गवळी, दिलीप पाटील, प्रदीप पाटील, शिवाजी दुर्वे, शेडजी मोहिते यांनी, कामे ठप्प असल्याबाबत आक्रमक पवित्रा घेत, पुढील सभेपर्यंत प्रशासनाने कामे सुरू केली नाहीत, तर अधिकाऱ्यांना सभागृहाबाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा दिला. दोन लाखापर्यंतची कामे, आवश्यक आहेत काय? असा शेरा मारून मुख्य लेखापरीक्षक परत पाठवित असल्याची तक्रार गवळी व दुर्वे यांनी केली. पाटील यांनी उपायुक्त पवार यांना विचारणा केली असता, कामाची गरज ही उपायुक्त व विभाग प्रमुखांनी पाहावयाची आहे. लेखापरीक्षकांनी आर्थिक तरतूद आहे का, यायची पडताळणी करावयाची असल्याचे त्यांनी सांगितले. यशवंतनगरमध्ये पवासाळ्यातही कमी दाबाने पाणी येत असल्याची तक्रार नगरसेविका जगदाळे यांनी केली. (वार्ताहर)ठेकेदारांची बैठक घेणार : विजय पवारठेकेदारांच्या थकीत बिलाबाबत बैठक घेऊन कामे करण्याची सूचना देण्यात येईल, असे उपायुक्त विजय पवार यांनी सांगितले. कायदा व व्यवहाराची सांगड घालण्याचे ज्ञान प्रशासनाला नसल्याची टीका करीत सदस्यांनी अधिकाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली.कामे ३६ टक्के कमी खर्चात करणाऱ्या ठेकेदारांकडून कामे दर्जेदार व्हावीत यासाठी ३६ टक्के रकमेची अनामत घेण्याचा ठराव करण्यात आला.दहा कोटींची कामे मंजूरमिरजेतील रस्ते, गणेशोत्सवासाठी २८ लाखांच्या खर्चाचा मुरूमाचा भराव, बांधकाम विभागाकडून चार कोटी खर्चाच्या रस्ते कामाच्या निविदा व शासन अनुदानातून साडेतीन कोटींच्या पायाभूत सुविधांच्या कामांची निविदा काढण्यास सभेत मान्यता देण्यात आली.
महापालिका सदस्यांकडून अधिकारी धारेवर
By admin | Published: July 28, 2016 12:09 AM