सांगली : शासकीय अधिकाऱ्यांची ठराविक मुदतीनंतर जिल्ह्याबाहेर बदली होणे अपेक्षित असताना, कोरोनाच्या नावाखाली अनेक अधिकारी जिल्ह्यातच ठाण मांडून असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे बदल्यांना मिळत असलेली स्थगितीचा पुरेपूर फायदा उठवत हे अधिकारी कारभार करत असून, शासनाने आता बदली प्रक्रियेला सुरुवात केल्याने या अधिकाऱ्यांची बदली होणे अपेक्षित आहे.
शासकीय नियमानुसार कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला तीन वर्षांचा कार्यकाल दिलेला असतो. तर अपवादात्मक स्थितीत दोन वर्षांनंतरही बदली केली जाते. महसूल, पोलीससह इतर विभागांतील अधिकारी मात्र, तीन वर्षांहून अधिक काळ झाला, तरी जिल्ह्यातच कार्यरत आहेत. २०१९ मध्ये जिल्ह्यातील १०४ गावांना महापुराचा फटका बसल्याने त्यावेळी काही बदल्यांना स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर गेल्यावर्षीपासून कोरोनाचा कहर कायम आहे. कोरोना नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत, असे आदेश असल्याने या आदेशाचा पुरेपूर फायदा अधिकारी घेत आहेत.
एका अधिकाऱ्याचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्याठिकाणी नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे प्रशासकीय कामकाजात सुधारणा होत असतात. शिवाय यापूर्वी तो अधिकारी कार्यरत असलेला जिल्हा अथवा विभागातील काही चांगल्या प्रशासकीय सुधारणा अंमलात आणण्यात येतात. मात्र, कोरोनाच्या आडून आता अधिकारी जिल्हाच सोडायला तयार नसल्याचे चित्र आहे.
चौकट
पोलीस, महसूलला जिल्हा मानवला
पोलीस व महसूल खात्यातील अनेक अधिकारी आपला कार्यकाल पूर्ण झाला तरी स्वत:हून बदली करून घेण्यास उत्सुक नाहीत. त्यात शासनाकडूनही बदल्यांना स्थगिती मिळत असल्याने शासनाचा हा निर्णय अधिकाऱ्यांच्या पथ्यावर पडत आहेत. एकीकडे कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून त्यांची गैरसोय करायची आणि स्वत: मात्र, सोयीच्या पोस्टिंगवर कायम राहण्याचे मनसुबे अधिकाऱ्यांनी आखले आहेत.