सांगली : कवठेमहांकाळ, जत, शिराळा, पलूस पंचायत समितीला गटविकास अधिकाऱ्यांची पाच, तर पंचायत समितीला गटशिक्षणाधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची ३७ पदे रिक्त आहेत. माध्यमिक, प्राथमिक शिक्षण विभागाला उपशिक्षणाधिकाऱ्यांचीही पदे रिक्त असून, ती भरण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. याचा फटका जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेला बसला असून, पाच पंचायत समित्यांचे कामकाजही ठप्प झाले आहे. कवठेमहांकाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद वर्षभरापासून रिक्त आहे. येथे शासनाने अधिकाऱ्यांची नियुक्ती करूनही ते हजर झाले नसल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. तसेच जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सेवानिवृत्त झाल्यामुळे येथील पद रिक्त झाले आहे. शिराळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दीपक चव्हाण वर्षभरापासून रजेवर आहेत. पलूस पंचायत समितीकडे गटविकास अधिकारी म्हणून संजय चिल्हाळ यांची नियुक्ती केली आहे. परंतु, दीड महिन्यापासून ते हजरच झालेले नाहीत. यामुळे चारही पंचायत समित्यांच्या कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची ३७ पदे रिक्त असून ती भरण्यासाठी शासनाकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. यामुळे अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरच उपलब्ध असत नाहीत. यामुळे पशुधनाला वेळेवर लसीकरण होत नाही. पशुधनाला उपचार करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने जिल्हा परिषदेकडील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहल पाटील यांनी शासनाकडे केली आहे. वर्षभर पदे रिक्त : कामकाजावर परिणाम मिरज, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, कडेगाव या पाच पंचायत समित्यांना गटशिक्षणाधिकारीच नाही. येथील अधिकाऱ्यांच्या अन्य ठिकाणी बदल्या झाल्यामुळे येथील पदे रिक्त आहेत. ही पदेही शासनाने गेल्या सहा महिन्यांपासून भरली नसल्यामुळे, तेथील तालुक्याच्या शैक्षणिक कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडील एक उपशिक्षणाधिकाऱ्याचे पदही रिक्त आहे. माध्यमिक शिक्षण विभागाकडेही उपशिक्षणाधिकाऱ्यांची पदे दोन वर्षापासून रिक्त आहेत.
जिल्हा परिषदेकडे अधिकाऱ्यांची वानवा
By admin | Published: October 02, 2016 1:06 AM