अशोक पाटील -- इस्लामपूर -आघाडी सरकारच्या काळात राज्याची तिजोरी मालामाल करण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आॅनलाईन लॉटरी बाजारात आणली. हा लॉटरी उद्योग जोमात चालण्यासाठी मटका, जुगार आणि खासगी सावकारीला तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी निर्बंध घातले. मात्र आता इस्लामपुरात पुन्हा या अवैध व्यवसायाने डोके वर काढले असून आॅनलाईन लॉटरी कोमात गेली आहे, तर आॅफलाईन मटका जोमात सुरू आहे.युती शासनाच्या काळात राज्याच्या तिजोरीत खडखडाट होता, असा आघाडी शासनाचा दावा होता. त्यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आमदार जयंत पाटील यांच्या हातात दिल्या. त्यांनी हे खाते सक्षमपणे चालवत, विविध मार्गाने तिजोरीत पैसा कसा येईल हे पाहिले. प्रामुख्याने त्यांनी आॅनलाईन लॉटरीला पसंती दिली. या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळू लागला. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मटका, जुगार, इतर अवैध व्यवसाय बंद केल्याने हा ग्राहक आॅनलाईन लॉटरीकडे आपोआपच वळला. आता सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने आघाडी शासनाचे काही निर्णय रद्द केल्याने, पुन्हा एकदा मटका, जुगार, डान्स बार, खासगी सावकारी यांना ऊत आला आहे. इस्लामपूर पोलिस ठाण्यात खमक्या अधिकाऱ्याची नेहमीच वानवा राहिली आहे. त्यामुळे वाळवा तालुक्यात गुन्हेगारीसह अवैध व्यवसायांनी उच्छाद मांडला आहे. शहरातील राजकीय नेत्यांच्या आश्रयाखाली बेकायदेशीर मटक्याचा व्यवसाय राजरोस सुरु आहे. या व्यवसायातही मोठी स्पर्धा सुरु झाली असून चौका-चौकातील मोक्याच्या ठिकाणी आता मटका घेणाऱ्या खोक्यांची संख्या वाढली आहे.वाळवा तालुक्यात आता खासगी सावकारीही जोमात सुरु आहे. शहरातील काही नेते स्वत:च्या संस्थेतील पैसे गुंडांमार्फत सावकारीसाठी वापरु लागले आहेत. यामध्ये काही बचत गटांचाही समावेश आहे. भिशीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात खासगी सावकारी सुरु आहे. इस्लामपूर मतदार संघातील आमदार जयंत पाटील यांनी अर्थमंत्री असताना राज्याच्या हिताचे निर्णय घेतले होते. आता त्यांच्याच मतदारसंघातील राजकीय काही नेत्यांच्या अशिर्वादाने आॅफलाईन मटका जोमात सुरु केला आहे. या उद्योगाला पोलिस अधिकाऱ्यांचा अभय असून, मटका, जुगार आणि इतर अवैध व्यवसायाने उच्छाद मांडला आहे. या परिसरात शिक्षणासाठी व विविध कामांसाठी येणारे महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुणही अवैध व्यावसायाचे बळी पडत आहेत. याप्रश्नी आता आमदार पाटील यांनी स्वत: लक्ष घालून अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.पतसंस्थेचा पैसा खासगी सावकारीलापेठ परिसरातील एका नामांकित पतसंस्थेने खासगी सावकारीचा धंदा तेजीत आणला आहे. बोगस बचत गटाच्या नावे कर्ज प्रकरण करुन तो पैसा गरजूंना बेकायदेशीररित्या मासिक १५ ते २0 टक्के दराने दिला जात आहे. याची वसुली वेळेत न झाल्यास प्रसंगी गुंडांचाही वापर केला जात आहे. अशा व्यवसायात बहुतांशी पतसंस्था आणि सुवर्ण व्यावसायिक गुंतल्याचे समजते.इस्लामपूर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांमुळे अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. जोपर्यंत असे उद्योग बंद होत नाहीत, तोपर्यंत सामान्य नागरिकांना पोलिस न्याय देऊ शकणार नाहीत. हे अवैध उद्योग तातडीने बंद न झाल्यास आम्हाला पोलिसांविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल. यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही.- विक्रमभाऊ पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजयुमो, इस्लामपूर.
आॅनलाईन लॉटरी कोमात, आॅफलाईन मटका जोमात
By admin | Published: August 24, 2016 10:54 PM