लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील मुख्य बसस्थानकावर दोन दिवसांपासून मुक्कामाला असणार्या आजीबाईंची अखेर पोलिसांनी वृद्धाश्रमात व्यवस्था केली. या वृद्धेला आसरा मिळाल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. पोलिसांच्या या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुख्य बसस्थानकात ६५ ते ७० वर्षांची एक वृद्धा दोन दिवसांपासून मुक्कामाला होती. बसस्थानकावरील पोलीस कर्मचारी मुल्ला यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी काॅन्स्टेबल रणजित जाधव यांना वृद्धेबाबत माहिती दिली. जाधव यांनी वृद्धेची आस्थेवाईकपणे चौकशी केली. पण तिला फारसे काही आठवत नव्हते. थंडीच्या दिवसात बसस्थानकात या महिलेचे होणारे हाल पाहून, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, सहायक निरीक्षक रांजवे यांनी तिची चांगल्या ठिकाणी व्यवस्था करण्याची सूचना केली.
याचदरम्यान मिरजेतील आश्रमाचे अध्यक्ष श्रीकांत लोखंडे यांनीही पोलिसांशी संपर्क साधून, या वृद्धेची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना आश्रमात सोडले. सध्या त्या सुखरूप असून सोशल मीडियावरून त्यांच्याबद्दलचा कोणताही संदेश व्हायरल करू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
चौकट
वृद्ध महिला आष्ट्याची?
या महिलेबाबतचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना कोल्हापूर, इस्लामपूरमध्ये पाहिल्याचे दूरध्वनी आले. पण त्यांच्याबाबत काहीच खातरजमा होऊ शकली नाही. त्यांच्याकडे आष्टा येथील आधारकार्ड सापडले आहे. त्यामुळे ती आष्टा येथील असावी, अशी शक्यता आहे.