सांगली : संपकऱ्यांसोबत चर्चा कशाला? पर्यायी यंत्रणा उभी करा असे आवाहन ग्राहक पंचायतीने केले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले असून सुशिक्षित बेरोजगारांना संधी देण्याची मागणी केली आहे.पंचायतीने निवेदनात म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या संपामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सरकारचेही अतोनात नुकसान होत आहे. संपकऱ्यांसोबत बोलणी सुरु असली, तरी त्यातून काहीही यश मिळत नसल्याचे दिसत आहे. संपामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे सरकारने संपकऱ्यांसोबत चर्चा करण्याऐवजी पर्यायी व्यवस्था उभी करावी.
सुशिक्षित बेरोजगार युवकाना संधी द्यावी. त्यांच्या नियुक्तीने अनुभवाअभावी जनतेची कामे वेळेत होणार नाहीत हे खरे आहे, परंतू, सध्या सरकारी कर्मचाऱ्यांकडूनही वेळेत कामे होत नाहीत, हेदेखील लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे नवख्या तरुणांना नागरिक समजून घेतील, पाठींबा देतील. संपकरी कर्मचाऱ्यांनीही जनतेला वेठीस धरू नये. त्यांच्या न्याय्य मागण्यांना नेहमीच पाठींबा आहे, परंतु संप समर्थनीय नाही. निवेदनावर पंचायतीचे जिल्हा पालक भास्कर मोहिते, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गोब्बी, उपाध्यक्ष महेश शानभाग, दत्ताजीराव मोहिते, जिल्हा संघटक जनार्दन झेंडे, विनायक पाटील, दीपक सगरे, भालचंद्र कुलकर्णी, शहाजीराव कदम, रावसो दळवी यांच्या सह्या आहेत.जनतेत तीव्र असंतोषग्राहक पंचायतीने निवेदनात म्हंटले आहे की, संपाविषयी जनतेच्या मनामध्ये तीव्र असंतोष आहे. त्याचे ज्वलंत उदाहरण कोल्हापूर येथील युवकांच्या मोर्चाचे आहे. संपकऱ्यांनीही हे ध्यानी घ्यायला हवे.