अशोक पाटील।इस्लामपूर : जयंत पाटील यांची पुन्हा मंत्रिपदावर वर्णी लागल्यानंतर गेल्या वीस वर्षांपासून त्यांच्याभोवती असलेले कोंडाळे पुन्हा कार्यरत झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ज्येष्ठ, युवक, निष्ठावान कार्यकर्त्यांची पंचाईत झाली आहे.
जयंत पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीत दोनवेळा युतीचे सरकार आले. या कालावधित त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले. त्यावेळी काहींनी कोलांटउड्या मारल्या, तर काहीजण राष्ट्रवादीत राहून, रात्री तत्कालीन मंत्री सदाभाऊ खोत यांच्या गोटात होते. आता त्यातील काहीजण मतदार संघातील दौऱ्यात पाटील यांच्याबरोबर असतात. ते ग्रामीण भागातील दौºयातही असतात. त्यामुळे ग्रामीण कार्यकर्त्यांची पंचाईत होते.
विधानसभेला राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले. पाटील यांना उपमुख्यमंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती. परंतु त्यांना जलसंपदा मंत्रीपद मिळाले. यापूर्वी त्यांनी अर्थ, ग्रामविकास, नगरविकास, गृह आदी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. आता जलसंपदामंत्री म्हणून काम करताना त्यांच्यापुढे आव्हाने आहेत. त्यातच मतदार संघातील प्रश्न, कार्यकर्त्यांतील गटतट आणि सभोवती असलेले तेच ते कार्यकर्ते यामुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठ आणि युवक कार्यकर्त्यांची पंचाईत झाली आहे.