सांगली : सांगलीतील विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दोन दिवसांत तब्बल १२० गाडी आंब्याची आवक झाली आहे. शुक्रवारी आंबा खरेदीसाठी जिल्ह्यातील व्यापारी व ग्राहकांनी तुफान गर्दी केली होती. देवगड हापूस आंबा ४०० ते ५०० रुपये डझन व कर्नाटक हापूस २५० ते ३०० रुपये डझन असे भाव होते.विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये अक्षय तृतीयेनिमित्त गुरुवार आणि शुक्रवारी मोठ्या प्रमाणात आंबा आवक झाली होती. पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकामध्ये सांगली हे आंब्याच्या विक्रीसाठी मोठे मार्केट समजले जाते. कोकणातील देवगड, रत्नागिरी, मालवण, चिपळूण लांजा, राजापूर, आधी परिसरातून देवगड हापूस, पायरी, लालबाग व मालवण आंब्याची गेल्या दोन दिवसात १२० गाड्यांची आवक झाली आहे, अशी माहिती सांगली बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी दिली.मुहूर्तावर देवगड हापूस आंबा प्रति डझन ४०० ते ५०० रुपये तर चार डझनाची पेटी दोन हजार रुपये असे भाव होते. केशर आंबा ७० ते १०० रुपये किलो, तसेच कर्नाटक हापूससुद्धा मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. कर्नाटक, आंध्र, तेलंगणा व तामिळनाडू परिसरातून दररोज ३० ते ४० गाड्या भरून आंबा सांगली मार्केटमध्ये विक्रीसाठी येतो. कर्नाटकी हापूसचा दर २०० ते २५० रुपये डझन, तर पायरी २५० ते ३०० रुपये डझन, असा किरकोळ विक्रीचा सध्या दर आहे.
अस आहेत आंब्याचे डझनाचे दर
- देवगड हापूस : ४०० ते ५०० रुपये
- रत्नागिरी हापूस : ३०० ते ४०० रुपये
- कर्नाटक हापूस : २५० ते ३०० रुपये
- पायरी : २५० ते ३०० रुपये
- केशर : ७० ते १०० रुपये किलो
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याची आवक चांगली झाली आहे; पण आंब्यास मागणी असल्यामुळे हापूस प्रति डझन ३०० ते ५०० रुपयांपर्यंत दर आहेत. पायरीची आवक कमी असल्यामुळे २५० ते ३०० रुपये दर मिळत आहेत. कर्नाटक हापूसचीही आवक सुरू झाली आहे. -अशोक खांडेकर, फळविक्रेता