पुनवत : म्हाडाकडे घरांसाठी अर्ज केलेल्या गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना पात्रता निश्चित करण्यासाठी कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करताना गिरणी कामगारांची पुरती दमछाक होत आहे. घरांसाठी अर्ज करताना कागदपत्रांचे पुरावे जोडले आहेत, त्यानंतरही पात्रता निश्चितीची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी हैराण झाले आहेत.मुंबईतील बंद किंवा आजारी पडलेल्या ५८ गिरण्यांमधील कामगारांनी सुमारे १० वर्षांपूर्वी म्हाडाकडे घरांसाठी अर्ज केले होते. सांगली जिल्ह्यातील हजारो गिरणी कामगारांचा त्यात समावेश आहे. त्यापैकी काहींना मुंबईत घरे मिळाली. त्यानंतरही अद्याप सुमारे दीड लाख कामगार घरांपासून वंचित आहेत. त्यांना सध्या संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी म्हाडातर्फे कालबद्ध अभियान राबविण्यात येत आहे.म्हाडाच्या कागदपत्रांच्या भल्यामोठ्या यादीमुळे गिरणी कामगारांना पुन्हा एकदा कागदपत्रे शोधण्याची वेळ आली आहे. अनेक गिरणी कामगार अर्ज केल्यानंतर मयत झाले आहेत. सध्या त्यांच्या वारसांची तारांबळ उडाली आहे. ग्रामीण भागात नेटवर्कचीही समस्या येत आहे. शिवाय आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे.
गिरण्यांकडे कागद, पुन्हा कशासाठी मागणी?गिरण्यांकडे कामगारांचे रेकॉर्ड असताना, तसेच अर्ज करतेवेळी कागदपत्रे सादर केलेली असताना आता पुन्हा ती अपलोड कशासाठी करायची? असा प्रश्न लाभार्थ्यांनी विचारला आहे.
अपलोड करावयाची कागदपत्रे कामगारांचे ओळखपत्र, तिकीट क्रमांकाचे दस्ताऐवज, सेवा प्रमाणपत्र, लाल पास, डिस्चार्ज ऑर्डर, फंड पावती, इएसआयसी कार्ड, गिरणीचे प्रमाणपत्र, हजेरी पत्रक, रजा पत्रक, सेवानिवृत्ती उपदान आदेश, सेवानिवृत्ती अदा आदेश, पगार पावती, आधारकार्ड अशी कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करायची आहेत. यातील काही कागदपत्रांतील त्रुटींमुळे कामगारांची दमछाक होत आहे.