सांगली : महापालिका क्षेत्रात पावसाळापूर्व नालेसफाईसाठी प्रशासनाने आतापासूनच तयारी चालविली आहे. दरवर्षी तीनही शहरांतील नालेसफाईवर ३० ते ३५ लाख रुपये खर्च केले जातात. यंदा मात्र या कामासाठी १ कोटी ४८ लाख रुपयांची निविदा काढली जाणार आहे. नालेसफाईवर दरवर्षीपेक्षा चौपट खर्च असल्याने नगरसेवकांनी आश्चर्य व्यक्त केले. यावर गुरुवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर महापालिका क्षेत्रातील नाल्यांच्या सफाईची मोहीम हाती घेतली जाते. त्यात पावसाळ्याच्या तोंडावर निविदा काढल्या जातात. परिणामी सफाईचे काम व्यवस्थितरित्या होत नाही. शहरात थोडा जरी पाऊस झाला तरी स्टेशन चौक, मारुती चौक, शंभरफुटी रस्त्यावर पाणी साचून राहते. रस्त्यांवरील पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन ते तीन तास लागतात. यंदा मात्र प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यापासूनच नालेसफाईचे नियोजन हाती घेतले आहे. ही बाब समाधानकारक असली तरी, दरवर्षी नालेसफाईवर ३५ लाख रुपये खर्च केले जातात. मग यंदा दीड कोटीची तरतूद कशासाठी, असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे.सभेत दोन शववाहिका खरेदीचाही विषय आहे. ३० लाख रुपये खर्चून दोन शववाहिका खरेदी केल्या जाणार आहेत.
सध्या तीन शहरांसाठी दोन शववाहिका आहेत. त्यापैकी एक सातत्याने नादुरूस्त असते. शववाहिका खरेदीबरोबरच त्यावर चार वाहनचालक मानधनावर नियुक्तीस मान्यता देण्यावरही चर्चा होणार आहे. याशिवाय प्रगती कॉलनीत उद्यानाची उभारणी, मिरजेतील शिवाजी रोडचे डांबरीकरण, श्रीकांत चौक ते गाडवे चौकापर्यंत रस्ता हॉटमिक्सच्या खर्चास मान्यता देण्याचा विषयही सभेसमोर आहे.