अविनाश बाड ।आटपाडी : वाचन हे पेरणं असतं, उगवण्याची चिंता करत बसण्यापेक्षा पेरणी सुरू करा. एक दिवस तुमचं उगवलेलं धान्य लोक पेरणीसाठी घेऊन जातील... असं वाचनाचं महत्त्व सांगणाऱ्या साने गुरुजींच्या स्वप्नातील पेरणी आटपाडीत सुरू आहे. महाराष्टÑ साहित्य परिषदेची आटपाडी शाखा आणि दिशा वाचनालयाच्यावतीने ‘पुस्तक वाचन आणि आकलन’ या अभिनव स्पर्धेत ६५० स्पर्धकांनी तब्बल ६ हजार ५०० पुस्तके वाचली आहेत.थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर आणि शंकरराव खरात या साहित्यिकांच्या भूमित गेल्या दोन वर्षांपासून अबालवृद्धांसाठी अनोख्या वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांची ही संकल्पना आहे. पहिली ते चौथी बालगट, पाचवी ते सातवी लहान गट, आठवी ते १० वी मोठा गट, अकरावी ते पदव्युत्तर महाविद्यालयीन गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटासाठी प्रथम क्रमांक ते उत्तेजनार्थ अशा पाच क्रमांकासाठी रोख बक्षिसे देण्यात येत आहेत. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रश्स्तीपत्र आणि एक पुस्तक भेट दिले जाते.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दहा पुस्तके वाचणे बंधनकारक आहे. वाचलेल्या पुस्तकातील भावलेली टिपणे आणि अक्षर पुस्तकांची निवड यावर क्रमांक अवलंबून आहे.खुल्या गटासाठी १० पुस्तकांपैकी एक पुस्तक ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर किंवा शंकरराव खरात यांचे वाचणे बंधनकारक आहे. गेल्या वर्षीपासून ही स्पर्धा सुरू आहे. गेल्यावर्षी फक्त आटपाडी तालुक्यापुरती सिमित असलेली ही स्पर्धा यंदा पश्चिम महाराष्टÑात पोहोचली आहे. यंदा सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील ६५० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.या अभिनव स्पर्धेसाठी कार्यवाह दिनेश देशमुख यांनी अनेक शाळा-महाविद्यालयात जाऊन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कवी सुभाष कवडे, माजी प्राचार्य डॉ. सुभाष कारंडे यांच्यासह आबासाहेब देवकुळे, सुधीर लाटणे, समाधान ऐवळे, मिलिंद वाले, पोपट देशमुख, प्रा. श्रीकृष्ण पडळकर, सौ. सारिका देशमुख, दत्तात्रय नागणे, प्रा. विजय शिंदे, प्रा. संताजी लोखंडे, प्रकाश नामदास, सुनील भिंगे स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
- वाचणाऱ्यांना आज शाबासकी!
आटपाडीतील माऊलीनगर (पोस्ट कार्यालयाशेजारी) आज रविवारी सायंकाळी पुस्तक वाचन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. ग्रामीण कथाकथनकारडॉ. संताजी पाटील आणि प्रा. संभाजीराव गायकवाड यांचे विनोदी कथाकथन होणार आहे. या कार्यक्रमात सहभाग घेणाºया प्रत्येकाला एक पुस्तक भेट दिले जाणार आहे.
माणसाच्या सर्व नाशाचे मूळ अज्ञान हेच आहे. अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे नेणारी पुस्तके जीवनातील दीपस्तंभ असतात. ‘ग्रंथ हेच गुरू’ ही भूमिका या स्पर्धेच्या केंद्रस्थानी आहे. पुढील काळात ही वाचन चळवळ अधिक व्यापक होण्यासाठी प्रयत्न करू.- अमरसिंह देशमुख, अध्यक्ष, महाराष्टÑ साहित्य परिषद, शाखा आटपाडी