मोहन मगदूम ।लिंगनूर : लिंगनूर (ता. मिरज) येथील सतीश मगदूम यांनी एक एकर शेतात कोणत्याही रसायनिक खतांचा वापर न करता शेवंती, झेंडू, गलांडा, अॅस्टर या फूलझाडांची लागवड केली आहे. या फूल शेतीतून साडेसात लाखांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे.सतीश यांनी एक एकरात साधारण तीन ते चार महिन्यांपूर्वी झेंडू, शेवंतीच्या रोपांची बेड पद्धतीत लागवड केली. यामध्ये ठिबकद्वारे पाण्याचे नियोजन करण्यात आले. योग्य पाणी व सेंद्रिय खतांची मात्रा दिल्याने रोपांची वाढही चांगली झाली आहे. अडीच महिन्यानंतर शेतातील दुतर्फा लाकडी मंडप तयार करून झाडांना आधार दिला. चांगल्या दर्जामुळे बाजारभावही चांगला मिळतो. सध्या शेवंतीची बाग फुलांनी बहरली आहे. परिपक्व फुलांची तोडणी केली जात आहे. दररोज शंभर ते सव्वाशे किलो फुलांचे उत्पादन मिळत आहे. तोडलेली फुले मिरज बाजारात विक्रीसाठी पाठविली जात आहेत. प्रतिनुसार फुलांना प्रतिकिलो ५० ते २०० रुपये दर मिळत आहे. सतीश यांच्या आई विमल यांची या फूलशेतीमध्ये मोठी साथ आहे. नियमित पहाटे चार वाजता सतीश व आई हे दोघे फुलांची तोड करतात. याच उत्पन्नातून सतीश यांनी यावर्षी चारचाकी गाडीही खरेदी केली आहे.सध्या ते दररोज मिरज शहरात फुले विक्रीसाठी स्वत:च्या चारचाकीतून जातात. याशिवाय त्यांनी शेजारच्या शेतकऱ्यांना फूल शेतीचे मार्गदर्शन करून हजारो रुपयांचे उत्पादन मिळवून दिले आहे. सतीश यांच्या उत्पादनास सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी आणि कर्नाटकमधून मागणी आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दसºयावेळी या फुलांना चांगला दर मिळाला. आणखी उत्पादन निघणार असून, सणांच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणच्या बाजारपेठेतून झेंडूची विक्री केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.‘फुलराणी’ची प्रतीक्षासेंद्रिय पद्धतीने पिकवलेली फुले घेण्यासाठी मिरज, सांगली फूल बाजारपेठेत सतीश यांच्या ‘फुलराणी’ या गाडीची व्यापारी वाट पाहत असतात. ताजी व सुंदर फुले असल्याचा विश्वास सतीश यांनी संपादन केला आहे. यामुळे सध्या लग्नसराईमध्ये व विविध कार्यक्रमांमध्ये हारतुरे व सजवटीचे कामदेखील त्यांना मिळत आहे.लिंगनूर (मगदूमवाडी, ता. मिरज) येथील सतीश मगदूम यांनी सेंद्रिय पद्धतीची फूलशेती फुलवली आहे.
एकरात साडेसात लाखांची सेंद्रिय फूलशेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:08 AM