मिरज : मिरजेतील ईदगाहनगर येथे झोपडपट्टीत शुक्रवारी गरम शिरखुर्म्यात पडल्याने दीड वर्षे वयाच्या बालकाचा मृत्यू झाला. अरहान मोहसीन मणेर असे मृत बालकाचे नाव आहे. रमजान ईददिवशीच अरहान याच्या मृत्यूमुळे मणेर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
ईदगाहनगर येथील मोहसीन मणेर फुलांचा व्यापार करतात. त्यांच्या घरात शुक्रवारी सकाळी ईदची तयारी सुरू होती. सकाळी दहाच्या दरम्यान घरातील मोठ्या पातेल्यात शिरखुर्मा (खीर) बनवून ठेवला होता. घरात काॅटखाली गरम खिरीचे पातेले ठेवून मणेर कुटुंब घराबाहेर इतर कामात गुंतले होते. यावेळी पलंगावर झोपलेला दीड वर्षाचा अरहान उठल्यानंतर काॅटवरून खाली उतरताना गरम खिरीच्या पातेल्यात पडला. गरम खिरीत पडल्याने तो होरपळला. त्याच्या ओरडण्यामुळे मणेर कुटुंबीयांनी खोलीत धाव घेतली असता अरहान गरम पातेल्यात पडल्याचे दिसले.
सुमारे ऐंशी टक्के भाजल्याने गंभीर जखमी झालेल्या अरहानला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. रमजान ईददिवशीच घडलेल्या या घटनेबाबत ईदगाहनगर परिसरात हळहळ व्यक्त होत होती.