मिरज : मिरजेत अडीच कोटींच्या रक्तचंदन तस्करीप्रकरणी गांधी चौक पोलिसांनी आफ्रिद खान या आणखी एका संशयिताला बंगळुरू येथून अटक केली. पोलिसांच्या कारवाईमुळे बंगळुरूमधील रक्तचंदन तस्कर टोळीचा सूत्रधार शाहबाज खान व इम्रान खान हे दोघे भाऊ फरार झाले आहेत.मिरजेत पकडलेले चंदन कोल्हापूर येथून सातारा येथे नेण्यात येत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
बंगळुरू-मिरजमार्गे होणारी रक्तचंदनाची तस्करी गांधी चौक पोलिसांनी सोमवारी उघडकीस आणली. मिरज-कोल्हापूर रस्त्यावर पोलिसांनी बंगळुरू येथील टेम्पो पकडून सुमारे दोन कोटी ४५ लाख रुपयांचे रक्तचंदन जप्त केले. ‘पुष्पा’ चित्रपटाप्रमाणे प्रत्यक्षात रक्तचंदन तस्करी उघडकीस आल्याने या तस्करीत बंगळुरू येथील टोळी सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी अटक करण्यात आलेला टेम्पोचालक यासिन इनायतुल्ला खान याने आणलेले चंदन बंगळुरूमधील शाहबाज खान व इम्रान खान यांचे असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. रक्तचंदन कोल्हापूर येथे जाणार असल्याची कबुली दिली असली तरी प्रत्यक्षात ते सातारा येथे नेण्यात येत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.बंगळुरू व्हाया सातारा कनेक्शनची पोलिसांनी चाैकशी सुरू केली आहे. बंगळुरू येथे पकडलेल्या आफ्रिद खान याच्याकडून चंदन तस्कर टोळीबद्दल आणखी माहिती मिळण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.