लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : चोरीच्या संशयावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने एकाला अटक केली. विकी शरद केंगार (वय २३, रा. काळीवाट, हरिपूर रोड, सांगली) असे त्याचे नाव आहे. त्याच्या कब्जातून तीन मोटारसायकलच्या चाव्या जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी मालमत्तेच्या गुन्ह्यातील हिस्ट्रीशिटर व सांगली जिल्ह्यातून तडीपार केले आरोपी हे पुन्हा जिल्ह्यात येतात, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी एक खास पथक तयार केले. सोमवारी हे पथक खासगी वाहनाने सांगली विभागात हद्दीत संशयितांची माहिती घेत असताना बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळील शिकलगार गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पानपट्टीच्या बंद खोक्याच्या आडोशाला विकी केंगार हा अंधारात लपून बसला होता. पोलिसांनी त्याला हाक मारता तो पळून जाऊ लागला. पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता तीन मोटारसायकलच्या वेगवेगळ्या चाव्या मिळून आल्या. त्याबाबत त्याच्याकडे चौकशी करता त्याने समाधानकारक माहिती दिली नाही. तो चोरी किंवा घरफोडी करण्याच्या उद्देशाने संशयितरीत्या मिळून आल्याने त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२२ प्रमाणे कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मेघराज रूपनर, अरुण औताडे, नीलेश कदम, वैभव पाटील यांनी भाग घेतला.