वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे महसूलच्या पथकास फोन करुन वाळूचा ट्रॅक्टर धरुन दिल्याचा संशय मनात धरुन गणेश गायकवाड (वय २४) यास पाच जणांनी मारहाण केली. अशी तक्रार चिंचणी वांगी पोलिसात दाखल केली आहे.
वांगी येथे येरळा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी सुरु आहे. वाळू चोरी रोखण्यासाठी तहसीलदार शैलेजा पाटील व तालुक्यातील सर्कल, तलाठी यांचे पथक काम करीत आहे.
शुक्रवारी पहाटे पथकाने वांगी येथे वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला. त्या ट्रॅक्टरवर कारवाई करून तो तहसीलदार कार्यालयात नेण्यात आला. हा ट्रॅक्टर गणेश मुकुंद गायकवाड याने धरुन दिला असल्याचा संशय आल्याने त्यास वांगी येथील देवराष्ट्रे रस्त्यालगत वनविभागाच्या हद्दीत मारहाण करण्यात आली. कुणाल नांगरे, अमोल नंदकुमार होलमुखे, अनिल बाळासाहेब बोडरे, सतीश भगवान तुपे, विक्रम दिलीप माळी (सर्व रा. वांगी) यांनी काठीने, हाताने व लाथा, मुक्काने मारहाण केली असल्याची तक्रार गणेश गायकवाड याने चिंचणी-वांगी पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार विशाल साळुंखे करीत आहेत.