सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथे नळावर पाणी भरण्यावरून झालेल्या वादावादीतून एकाला लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सुनील लक्ष्मण रिथे (रा. भुई गल्ली, हरिपूर) यांनी युनीस शेख व त्याच्या पत्नीविरोधात सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी रिथे व संशयित एकाच गल्लीत राहतात. रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास रिथे हे नळावर पाणी भरत होते, यावेळी संशयिताने तिथे येत पाणी भरण्याची आमची वेळ आहे म्हणून त्यांना शिवीगाळ सुरू केली. यातून वादावादी झाल्यानंतर संशयिताने तिथेच पडलेली लोखंडी पाईप रिथे यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.