लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : बुरुंगवाडी (ता. पलूस) जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या (एम.एच.११ ए. डब्लू.४००२) या क्रमांकाच्या चारचाकी गाडीने, (एम.एच.१० डी.एच.४४०२) या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात धनंजय शंकर पाटील (३५, रा. धनगाव, ता. पलूस) यांचा मृत्यू झाला. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविणारा चालक श्रीरंग पांडुरंग जाधव हा अपघातस्थळावरून गायब झाला. सदर घटना बुधवारी सायंकाळी घडली.
याबाबत भिलवडी पोलिसांत अभिजित शिवाजी साळुंखे (रा. धनगाव) यांनी गुरुवारी सकाळी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाटील हे चितळे डेअरी भिलवडी स्टेशन येथे नोकरीस होते. सुटी झाल्यानंतर ते (एम.एच.१० डी. एच. ४४०२) या मोटारसायलवरून धनगावकडे निघाले होते. बुरुंगवाडी ते धनगाव रस्त्यादरम्यान असणाऱ्या कालव्याजवळ आले असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ( एम.एच.११ ए. डब्लू.४००२) या क्रमांकाच्या चारचाकी गाडीने त्यांना धडक दिली. गाडीवरून पडलेल्या धनंजय पाटील यांना गाडीसह २५ फुटांवर फरफटत नेले. यावेळी पायांना गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. सदर घटनेची माहिती समजताच धनंजय पाटील यांच्या गावातील मित्रांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी सांगली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास धनंजय पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धनंजयला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेताना श्रीरंग जाधव हा पसार झाला. भिलवडी पोलिसांनी गाडीचालक श्रीरंग जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल माणिक मोरे करत आहेत.
चौकट
एकाने जीव वाचविला
चारचाकी चालक श्रीरंग जाधव हा गाडी फिरविण्याचा निमित्ताने भिलवडी स्टेशनहून बुरुंगवाडीमार्गे धनगाव जवळील ओढ्यापर्यंत गेला होता. तेथून तो भरधाव वेगाने नागमोडी वळणे घेत गाडी चालवत होता. त्याच्या गाडीचा वेग पाहून एका शेतकऱ्याने रस्त्यावरून गाडी शेतात घातली व आपला जीव वाचविला. रस्त्याच्या बाजूला असणारी चार झाडे मोडली तर त्याच्या गाडीत दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत.