शिराळा : खेड (ता. शिराळा) येथील आप्पासाहेब राजाराम खबाले (वय ६०) यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला.
आप्पासाहेब यांना आकडीचा त्रास होता. १ जानेवारी रोजी ते कपडे धुण्यास, अंघोळीसाठी गेले असताना, आकडी येऊन विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत आप्पासो खबाले खेड येथे मोलमजुरी करून गावातीलच भैरवनाथाच्या मंदिरात झोपत असत. त्यांची पत्नी मुलासह माहेरी चिखलवाडी येथे राहण्यास आहे.
ते एक जानेवारीपासून गावात आढळून आले नव्हते. दुसऱ्या दिवशी त्यांचे कपडे मोळीतील विहिरीजवळ आढळल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र काहीच आढळून आले नाही. रविवारी विहिरीतील पाण्याचा उपसा केला असता त्यांचा मृतदेह विहिरीतील गाळात अडकलेला आढळून आला. याबाबत दादासाहेब खबाले यांनी शिराळा पोलिसांत वर्दी दिली आहे. तपास हवालदार कुमार गायकवाड हे करीत आहेत.