सांगली : कोरोनाचा कहर आणि लागू करण्यात आलेल्या निर्बंधातून सुटका झाल्यानंतर यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ८१ गावांत यंदा ‘ एक गाव एक गणपती ’ उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाला यंदा तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला आहे.
गणेशोत्सव कालावधीत पोलिसांवरील ताण कमी व्हावा व समाजात एकोप्याचे वातावरण वृद्धिंगत व्हावे यासाठी एक गाव एक गणपती उपक्रम राबविला जातो. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेवेळी या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी ३०१ गावांनी एक गाव एक गणपती उपक्रम राबविल्याने राज्यातही जिल्ह्याची प्रशंसा झाली होती.
गेली दोन वर्षे कोरोना संक्रमणात गेल्याने उत्सवावर निर्बंध कायम होते. यंदा मात्र, कोणत्याही निर्बंधाविना गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे मंडळांची संख्याही वाढली आहे.
पोलिसांनी यंदा गणेशोत्सवानिमित्त शांतता कमिटी व गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यात एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, तुलनेने प्रतिसाद कमी मिळाला आहे.
जिल्ह्यात साडेचार हजारावर मंडळे
कोणत्याही निर्बंधाविना होणाऱ्या उत्सवात यंदा जिल्ह्यात ४७०० मंडळांनी नोंदणी केली. जिल्ह्यातील एका गावात एकही मंडळाने नोंदणी केलेली नाही. ८१ गावात मात्र, एक गाव एक गणपती उपक्रम असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.