मिरज : नवी मुंबईत गोल्ड एक्स्प्रेस या बोगस कंपनीव्दारे गुंतवणूकदारांना सुमारे शंभर कोटींची गंडा घातल्याप्रकरणी मीरा-भार्इंदर पोलिसांनी मिरजेतील एकास अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या मुनाफ नामक आरोपीने मिरजेत मोठ्याप्रमाणावर मालमत्ता खरेदी केल्याचा संशय असून, मीरा-भार्इंदर पोलिसांचे पथक मिरजेत चौकशीसाठी येणार आहे.मीरा-भार्इंदर येथे एक वर्षापूर्वी गोल्ड एक्स्प्रेस नामक कंपनीची स्थापना करून अमिन नामक भामट्याने गुंतवणुकीवर दरमहा रक्कम परतीची योजना सुरू केली होती.
नवी मुंबई परिसरातील हजारो लोकांनी या योजनेत गुंतवणूक केली असून, आठवड्यापूर्वी कंपनीचा संचालक अमिन याने पलायन केले. यामुळे गुंतवणूकदारांची सुमारे शंभर कोटी रुपयांची फसवणूक झाल्याने अमिन याचा साथीदार मुनाफ याच्यासह तिघांविरुध्द नयानगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुनाफ याच्यासह दोघांना मीरा-भार्इंदर पोलिसांनी अटक केली आहे. काही वर्षापूर्वी सामान्य परिस्थिती असलेल्या मुनाफ याने गेल्या पाच वर्षात कंपनीतून मिळालेल्या रकमेतून मिरजेत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक व मोठ्याप्रमाणात स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची माहिती मिळाल्याने चौकशीसाठी पोलीस पथक मिरजेत येणार आहे. यामुळे मुनाफ याच्याशी संबंधित असलेल्या मिरजेतील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.