सांगली : लॉकडाऊनमध्ये महिन्याभरापासून घराघरात कोंडलेल्या नागरिकांची आता जणू घुसमट होऊ लागली आहे. घराबाहेर पडून रस्त्यावर येणाऱ्यांकडून पोलिसांना शंभर कारणे आणि सतराशे साठ बहाणे ऐकायला मिळत आहेत. याची सवय झालेले पोलीस खऱ्या-खोट्याचा जागेवरच पंचनामा करत आहेत.
जीवनावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडण्याची मोकळीक असली तरी, त्याचा गैरफायदा घेऊन रस्त्यावर येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पाय मोकळे करायला म्हणून रस्त्यावर येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. काही महाभाग कुत्र्याला फिरवायला व शी-शू करण्यासाठीही रस्त्यावर घेऊन येत आहेत. शर्यतीचे घोडे पाळणाऱ्यांचीही गोची झाली आहे. अनेक दिवस घोडे एकाच ठिकाणी उभे करुन ठेवता येत नसल्याने त्यांना पळविण्यासाठी शौकीन रस्त्यावर येत आहेत.टॉप टेन कारणेऔषधे, दूध, भाजीपाला, किराणा, डॉक्टरकडे, रेशनिंग, जोडीदाराला ड्युटीवर सोडणे, शेताकडे, रुग्णालयात जेवण द्यायला, चारा आणायला ही पोलिसांना सांगितली जाणारी टॉप टेन कारणे आहेत.रस्त्यावर फिरणाऱ्यांची पोर्टलवर नोंदपोलीस अधीक्षकांनी लॉकडाऊन काळात पोर्टल सुरू केले असून, रस्त्यावर सतत फिरणाऱ्यांची नोंद त्यावर केली जात आहे. सक्षम ओळखपत्र किंवा सक्षम कारण नसणाऱ्यांची नोंद विशेषत: घेतली जात आहे. नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, वाहनाचा प्रकार व क्रमांक, बाहेर पडण्याचे कारण याची माहिती नोंदविली जात आहे. त्यावर वरिष्ठांचे लक्ष आहे. एखाद्याचा वावर वारंवार, संशयास्पद आणि विनाकारण जाणवला तर, कलम १८८ नुसार कारवाई व समज दिली जात आहे.वडिलांच्या मृत्यूचा असाही फायदाअहिल्यानगर परिसरातील एका तरुणाच्या वडिलांचे खासगी रुग्णालयात फेब्रुवारीमध्ये निधन झाले. त्यावेळच्या औषधोपचारांची कागदपत्रे घेऊन तो वारंवार रस्त्यावर येत होता. औषधे आणत असल्याचे सांगायचा. तो पोलिसांना गंडविण्यात काहीवेळा यशस्वी ठरला; मात्र एकदा संशय आल्याने कागदपत्रे तपासली. थेट मेडिकल चालकाशी संपर्क केला. तेव्हा बनवेगिरी चव्हाट्यावर आली. वडिलांच्या मृत्यूचेही भांडवल करणाऱ्य दिवट्याला चोप दिला. मावा आणण्यासाठी बाहेर पडत असल्याची कबुली त्याने शेवटी दिली.