इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथे भरधाव वेगात आलेल्या मोटार कारने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात सायंकाळी ६ वाजता वंजारी मळा परिसरात झाला. राजू निवृत्ती कुकडे (वय २२, कुंडल) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर, धर्मेंद्र बाबुराव राठोड (वय १८, रा. कुंडल) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर माेटारचालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
राजू कुकडे हा ट्रॅक्टरचालक म्हणून काम करत होता. सायंकाळी ६ च्या दरम्यान राजू कुकडे व धर्मेंद्र राठोड हे मोटारसायकलवरून (क्र. एमएच १० ईएक्स २७८३) बोरगावकडून पलूसच्या दिशेने निघाले होते. वंजारी मळा परिसरात आल्यावर समोरून भरधाव वेगात आलेल्या मोटारीने (क्र. एमएच १० इके ७६९४) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत राजू कुकडे व धर्मेंद्र राठोड हे गंभीर जखमी झाले. दोघांना सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, राजू कुकडे याचा वाटेतच मृत्यू झाला. दोघांच्याही डोक्याला आणि हातापायावर गंभीर मार लागला हाेता.
याबाबत रात्री कृष्णा निवृत्ती कुकडे याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून मोटारीच्या अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे अधिक तपास करत आहेत.