मिरज : कुपवाड औद्योगिक वसाहतीत श्रीनिवास कोल्ड स्टोअरेजमध्ये पाण्याच्या टाकीची सफाई करताना तीन कामगारांना विजेचा झटका बसला. अपघातात साहिल भरत डांगे (वय २५, रा. पंढरपूर चाळ, मिरज) हा कामगार ठार झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली.अमोल व्हटकर (रा. कुपवाड), शिवाप्पा मुरडी (रा. रामपूर, कर्नाटक) अशी जखमींची नावे आहेत. यापैकी अमाेल व्हटकर याची प्रकृती चिंताजनक आहे. दाेघांवरही सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत साहिल डांगे यांच्या मृतदेहाची मिरज शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.कुपवाड एमआयडीसीमधील श्रीनिवास कोल्ड स्टोअरेजमध्ये रविवारी सायंकाळी पाण्याच्या टाकीची सफाई सुरू होती. साहिल डांगे व अमोल व्हटकर हे पाण्याच्या टाकीत उतरून साफसफाई करत होते. यावेळी अचानक पाण्याच्या मोटरचा विद्युत प्रवाह सुरू झाल्याने साहिल व अमोल यांना विजेचा जाेरदार धक्का बसला. त्यांना वाचवण्यासाठी शिवाप्पा मुरडी हाही टाकीत उतरला. त्यालाही विजेचा धक्का बसला. विजेच्या जोरदार झटक्याने साहिलचा जागीच मृत्यू झाला. अमोल व शिवप्पा हे दोघे जखमी झाले. साहिलच्या मृत्यूची माहिती कळताच मिरज शासकीय रुग्णालयात नातेवाइकांनी गर्दी केली. पोलिसही रुग्णालयात दाखल झाले. कोल्ड स्टोअरेज मालकावर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा साहिलचे नातेवाईक व रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी घेतल्याने रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला हाेता. रात्री उशिरापर्यंत साहिलचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला नव्हता.
पाण्याच्या टाकीची सफाई करताना विजेचा धक्का, एक ठार; सांगलीतील कुपवाड औद्योगिक वसाहतीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 1:35 PM