कुपवाड : तानंग (ता. मिरज) येथील फाट्याजवळील एका हाॅटेल समोर डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार काकासाहेब तमान्ना कवलापुरे (रा. गवळीगल्ली, मिरज) हा जागीच ठार झाला. ईश्वर सखाराम बन्ने (रा. धनगर गल्ली, गुरुवार पेठ, मिरज) हे किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची कुपवाड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांनी डंपरचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी सायंकाळी काकासाहेब कवलापुरे व ईश्वर बन्ने हे दोघे जण मिरजेहून देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथे दुचाकीवरून (एमएच १० सीव्ही१८६५) जात होते. तानंग फाट्याजवळ पाठीमागून येणाऱ्या डंपरची (एमएच ०९ ईएम ९२०४) त्यांच्या दुचाकीला धडकल्याने मोटारसायकलवरील दोघेजण रस्त्यावर पडले. यावेळी काकासाहेब कवलापुरे यांच्या अंगावरून डंपर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ईश्वर बन्ने हे किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच कूपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला आहे. पोलिसांनी डंपरचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक महादेव जठार तपास करीत आहेत.