तासगाव : बस्तवडे (ता. तासगाव) येथे अवैधरित्या ब्लास्टिंग करणाऱ्या वाहनांमधील जिलेटिनच्या कांड्यांचा भीषण स्फोट झाला. या घटनेत प्रतीक मनमत स्वामी (वय २२) हा तरुण जागीच ठार झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. स्फोटात दोन ट्रक जागीच जळून खाक झाले. स्फोटाने तासगावपर्यंतचा दहा किलोमीटरचा परिसर हादरला. अनेक घरांना तडे गेले. घटनेनंतर तहसीलदार कल्पना ढवळे, पाेलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे व बॉम्बशोधक पथकाने धाव घेत तपास सुरू केला. ही घटना रविवारी दुपारी सव्वातीन वाजता घडली.
बस्तवडे येथे गट नंबर ३७७ मध्ये पटवर्धन परिसरात एक डोंगर आहे. या डोंगराचा काही भाग सिद्धेवाडी येथील संभाजी चव्हाण यांनी घेतला आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून येथील डोंगरावर जमीन सपाटीकरणासाठी अवैधरित्या ब्लास्टिंगचे काम सुरू होते. या कामासाठी महाराष्ट्र, बिहार व झारखंडमधील ४० हून अधिक कामगार काम करत होते. काम सुरू असताना तापलेल्या ड्रीलिंगच्या गाडीमधील कॉम्प्रेसर गरम होऊन एका सिलिंडरसह डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला. या स्फोटात जिलेटिनच्या कांड्यांचाही स्फोट झाला. स्फोटामुळे दोन्ही ड्रीलिंग ट्रकनी पेट घेतल्याने आग व धुराचे लोट सुरू झाले. यात दोन्ही ट्रक जळून खाक झाले. दोन्ही ट्रकमध्ये जिलेटिन कांड्या होत्या. स्फोटाची तीव्रता व आवाज इतका मोठा होता, की दहा किलोमीटरवरील घरांना धक्के जाणवले.
स्फोटात प्रतीक मनमत स्वामी (२२, रा. नागज, ता. कवठेमहांकाळ) याचा मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाचे छिन्नविच्छिन्न तुकडे ५०० फुटांपर्यंत विखुरले होते. याशिवाय उपेंद्र यादव (रा. झारखंड), ईश्वर गोरख बामणे (२१), महेश शिवाप्पा दुडणावार (२५. दाेघेही रा. अथणी, कर्नाटक) हे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर जखमींना तेथील काम करणाऱ्या लोकांनी प्राथमिक उपचारासाठी सावळज येथे हलवले. मात्र त्यांची प्रकृती अत्यवस्थ बनल्याने पुढील उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक दुबुले, पोलीस उपअधीक्षक शेंडगे, तहसीलदार ढवळे, सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्यासह पथक तात्काळ घटनास्थळी आले. तासगाव पोलीस व बॉम्बशोधक पथकाकडून तपास व पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
चौकट
स्फोटाने परिसर हादरला
रविवारी झालेल्या या स्फोटाने बस्तवडे परिसर हादरून गेला. हादरा, आवाज, धूर यामुळे भूकंप झाल्याच्या भीतीने लोकांनी घराबाहेर धाव घेतली व काय झाले याची चौकशी सुरू केली.
चौकट
अग्निशमन पथक बारा मिनिटात दाखल
घटनेची माहिती मिळताच तासगाव अग्निशमन दलाच्या गाडीने अवघ्या बारा मिनिटात १५ किलोमीटरचे अंतर कापत घटनास्थळी धाव घेतली. जागेवरील परिस्थिती व जिलेटिनच्या कांड्या इतरत्र पेरलेल्या असतानाही सुरेंद्र होवाळ, सुरेश देवकुळे, गोविंद तासगावे व शेखर घोलप यांनी जिवाची बाजी लावत आगीवर नियंत्रण मिळविले.
चौकट:
बॉम्बशोधक पथकाने नमुने घेतले
बस्तवडेच्या या भीषण स्फोटाची माहिती मिळताच सांगली येथील बॉम्बशोधक पथकाने श्वानासह घटनास्थळी तपास सुरू केला. स्फोटाने उडालेल्या विविध वस्तू व अन्य साहित्य त्यांनी तपासणीसाठी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत नमुने घेण्याचे काम सुरू होते.