विटा : देवाच्या जागरण कार्यक्रमावेळी आलेल्या मनोहर दामोदर गवळी (वय ५२, रा. खानापूर) यांचा अंधारात पाय घसरून पाण्याच्या हौदात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, दि. १६ जूनला घडली. मात्र, गुरुवारी सकाळी गवळी यांचा मृतदेह आढळून आला. ही घटना खानापूर येथील टायगर मळ्यात घडली.खानापूर येथे मंगळवारी रात्री जागरणाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम स्थळापासून काही अंतरावर ३३ बाय १३ फूट लांबीचा पाण्याने भरलेला मोठा हौद होता. मनोहर गवळी जागरण कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी रात्री दहाच्या सुमारास त्यांना अंधारात पाण्याचा हौद दिसला नाही. ते पाय घसरून हौदात पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जेवण करून गवळी घरी गेले असावेत, असा अंदाज तेथील लोकांना आला. त्यामुळे त्यांनी शोधाशोध केली नाही. गुरुवारी सकाळी हौदातील पाणी काढण्यात आले. त्यावेळी गवळी यांचा मृतदेह पाण्यात आढळून आला. या घटनेची माहिती विटा पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गवळी यांचा सलून व्यवसाय असून, त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेन परिसरात हळहळ व्यक्त होत होती.या घटनेची नोंद विटा पोलिसांत झाली आहे. या प्रकरणाचा हवालदार एम. व्ही. मोटे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)
खानापूरमध्ये पाण्याच्या हौदात पडून एकाचा मृत्यू
By admin | Published: June 18, 2015 10:42 PM