सांगली : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ४३ हजार लाडक्या बहिणींनी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज केले आहेत. या अर्जांची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यास एक आणि महापलिका क्षेत्रासाठी एक, अशा ११ समित्या गठित केल्या आहेत. १५ ऑगस्टपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा होणार आहेत.‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी सांगली जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४३ हजार ६९ महिलांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या अर्जांमध्ये ५४ हजार ७६७ महिलांनी ऑनलाइन, तर ८८ हजार ३०२ महिलांनी ऑफलाइन नोंदणी केली आहे. आता प्राप्त अर्जांची पडताळणी करण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे.दहा तालुक्यात दहा समित्या गठित केल्या असून, त्यांच्याकडून कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. महापालिका क्षेत्रासाठी एक समिती गठित केली असून, ती समिती शहरातील सर्व अर्जांची छाननी करणार आहे. ३१ जुलै रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १५ ऑगस्टपूर्वी हरकती, अंतिम यादी व लाभ वितरणाची तयारी केली जाणार आहे. १५ ऑगस्ट रोजी पहिल्या टप्प्यातील लाभार्थींच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत.
अर्ज करताना ‘या’ कागदपत्रांची गरजआधार कार्ड, रहिवासी दाखला, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे-केशरी रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीची कागदपत्रे चालणार आहेत.
या योजनेंतर्गत वय वर्षे २१ ते ६५ या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितक्त्या आणि निराधार महिलांना तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेस दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येत आहे. समित्यांद्वारे अर्जांची छाननी करून १५ ऑगस्टपासून पैसे जमा करण्यात येणार आहेत. -संदीप यादव, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांगली.