मिरज : मिरजेतील शनिवार पेठेत वृद्ध महिलेस शंभराची नोट देऊन एक लाख रुपये किमतीचे दोन तोळे सोने भामट्याने लंपास केले. याबाबत लीलावती बापूराव घोडके (वय ६०) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
शनिवार पेठेत घोडके यांचे कपड्यांचे दुकान असून, घोडके या अमावास्येनिमित्त गुरुवारी दुपारी बारा वाजता दुकानात पूजा करीत होत्या. यावेळी हिंदी बोलणारा एक भामटा तेथे आला. त्याने लीलावती यांना तुमच्या गळ्यातील दागिने माझ्या शंभराच्या नोटेला लावा, माझा यामुळे फायदा होईल, असे सांगितले. घोडके यांनी त्यास नकार दिल्यानंतरही भामट्याने आग्रह करून त्यांना गळ्यातील दोन तोळ्याची बोरमाळ काढण्यास भाग पाडले. घोडके यांची बोरमाळ शंभराच्या नोटेत गुंडाळून ती नोट दहा मिनिटे ड्राॅवरमध्ये ठेवण्यास सांगितले. नोट ड्राॅवरमध्ये ठेवल्यानंतर भामटा तेथून गायब झाला. घोडके यांनी शंभराची नोट काढून पाहिल्यानंतर त्यातील बोरमाळ गायब झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.