सांगली : मिरज तालुक्यात स्वाइन फ्लू झालेल्या कुटुंबातील बारा सदस्यांचे घशातील स्रावाचे नमुने चाचणीसाठी घेतले होते. त्यातून आणखी एका बालकाला संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.उर्वरित अकरा जणांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. २८ जून रोजी या गावातील दीड वर्षांच्या बालकास स्वाइन फ्लूची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. मिरज शासकीय रुग्णालयात तापावरील उपचारादरम्यान त्याची तपासणी केली असता स्वाइन फ्लू निष्पन्न झाला होता. उपचारांती त्याची तब्येत बरी झाल्याने घरी सोडण्यात आले होते. मात्र, खबरदारी म्हणून त्याच्या कुटुंबातील आणि संपर्कातील अशा एकूण बारा जणांचे घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. गुरुवारी त्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला.अकरा जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, दोन वर्षांच्या बालकाला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले. सध्या ते घरीच आहे. त्याची तब्येत ठणठणीत आहे. कोणतीही लक्षणे नाहीत. बालकावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
Sangli: मिरजेत आणखी एका बालकाला स्वाइन फ्लू, अकरा जणांचे अहवाल निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 4:57 PM