सांगलीत सेवा समितीच्या बैठकीत डॉ. गणेश देवी यांचा सत्कार सुरेश शेंडगे यांनी केला. यावेळी डॉ. बाबूराव गुरव, संगाप्पा पाटोळे, धनाजी गुरव आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘वन नेशन-वन इलेक्शन’ निर्णयामुळे देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्था संपुष्टात येणार आहेत. याविरोधात ‘वन नेशन, वन रिॲक्शन’ आंदोलनाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी केले.
सांगलीत सेवा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव, धनाजी गुरव यांच्यासह जिल्हाभरातून समविचारी कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. देवी म्हणाले, एकाच निवडणुकीच्या धोरणातून ग्रामपंचायतीपासून सर्वच संस्था हस्तगत करण्याचा मोदींचा डाव आहे. यातून काँग्रेसमुक्त भारत हेतू साध्य करण्यासोबतच सर्व विरोधी पक्षही संपविले जातील. हा डाव हाणून पाडला पाहिजे. देशभरातील शेतकरी आपापल्या राजधानीकडे ट्रॅक्टरवरून निघाला आहे. पोलीस त्यांना अडवून वाहन परवाने काढून घेत आहेत. ही हुकूमशाहीची लक्षणे आहेत.
यावेळी डॉ. बाबूराव गुरव, धनाजी गुरव, सदाशिव मगदुम यांचीही भाषणे झाली. ॲड. के. डी. शिंदे यांनी समितीचा हेतू सांगितला. बैठकीला सुरेखा गणेश देवी, राहुल मोरे, प्रशांत मगदुम, लक्ष्मण चव्हाण, सुरेश शेंडगे, ॲड. सुभाष पाटील, मारुती शिरतोडे, डॉ. संजय पाटील, सुशीला उदगावे, ऊर्मिला साळुंखे, विद्या स्वामी, कमल शिर्के, सिराजुद्दीन मुजावर आदी उपस्थित होते.
चौकट
भाजपविरोधी सरकारे बरखास्तीची भीती
डॉ. देवी म्हणाले, २०२४ मधील निवडणुकांपूर्वी अचानक राज्यपालांमार्फत आदेश काढून भाजपविरोधी राज्ये बरखास्त केली जाऊ शकतात. त्यामुळे वेळीच सावध होऊन १७८ मतदारसंघांत सेवा समितीच्या झेंड्याखाली एकत्र यायला हवे. याचाच एक भाग म्हणून ऑगस्टमध्ये सोलापुरात भटक्या-विमुक्तांचा व्यापक मेळावा आयोजित केला आहे.
चौकट
१२ फेब्रुवारीस वडियेरायबागमध्ये घोषणा
जिल्हाभरातून सेवा समितीची आखणी करून वडियेरायबाग येथे तिची अधिकृत घोषणा करण्याचा निर्णय बैठकीत झाला. १२ फेब्रुवारीस क्रांतिवीरांगणा हौसाबाई पाटील यांच्या जन्मदिनी तिची रीतसर स्थापना होईल.
-------