काँग्रेसने लोकसभेला कमावले, विधानसभेला गमावले; सांगली जिल्ह्यात दोन जागा गमावल्या, नेमकं काय चुकले..वाचा
By अशोक डोंबाळे | Published: November 24, 2024 05:02 PM2024-11-24T17:02:14+5:302024-11-24T17:02:45+5:30
सांगली जिल्ह्यात दोन जागा गमावल्या
अशोक डोंबाळे
सांगली : काँग्रेसच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत एकसंधपणा दाखविल्याने खासदार विशाल पाटील यांची बंडखोरी यशस्वी झाली. पण, लोकसभा निवडणुकीतील एकी काँग्रेस नेत्यांना विधानसभा निवडणुकीत दाखविता आली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या हक्काच्या सांगली व जत यादोन जागा गमवाव्या लागल्या. घराणेशाहीचा मुद्दा या निवडणुकीत मतदारांनी झिडकारल्याचे दिसून आले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी एकसंधपणा दाखविल्यामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्ते रिचार्ज झाले. कार्यकर्त्यांनी पदरमोड करून पक्षाचा प्रचार करून भरभरून मतांची शिदोरी काँग्रेस अपक्षांच्या पारड्यात टाकले. खानापूर, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ, मिरज, सांगली या पाच विधानसभा मतदारसंघात खासदार विशाल पाटील यांना मताधिक्य मिळाले होते. केवळ जत विधानसभा मतदारसंघात भाजपला सहा हजार २७१ मतांची आघाडी मिळाली होती.
लोकसभा निवडणुका होऊन सहा महिने पूर्ण होण्यापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. खासदार विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व घेतले होते. त्यामुळे विशाल पाटील आणि डॉ. विश्वजित कदम यांनी जिल्ह्यातील नेत्यांमधील संघर्ष संपवून त्यांना एकत्र आणण्याची गरज होती. पण, काँग्रेसची एकी करण्याऐवजी डॉ. विश्वजित कदम यांनी स्वत:च्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केले.
अर्थात भाजपचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभा केले होते. खासदार विशाल पाटील यांनी सांगलीतील काँग्रेसमधील वाद मिटविण्याऐवजी दादा घराण्याचा मुद्दा उपस्थित करून फुटीला खतपाणीच घातले. सांगलीतील काँग्रेसच्या वादाचे पडसाद जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात उमटले. नेत्यांच्या भूमिकेवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करून पक्षापासून फारकत घेतली. म्हणूनच २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेल्या मताची आकडेवारी उमेदवारांना टिकविता आली नाही.
जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची फरपट..
सांगलीतून भाजपचे सुधीर गाडगीळ मागील निवडणुकीत सहा हजार मताधिक्याने विजयी झाले होते; पण, २०२४ च्या निवडणुकीत त्यांना ३६ हजार १३५ मतांची आघाडी मिळाली. जतमध्येही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांचाही ३७ हजार १०३ मताने पराभव झाला. केवळ काँग्रेस नेत्यांची एकजूट नसल्यामुळे लोकसभा निवडणुकीतील यशानंतर विधानसभेला बेरीज होण्याऐवजी वजाबाकीच झाली. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे नेते आत्मचिंतन करून आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीपूर्वी संघर्ष संपवून नव्याने पक्षबांधणी करणार की नाही, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. नेत्यांनी संघर्ष थांबविला नाही, तर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची फरपट होणार आहे.
काँग्रेसचे आणखी काय चुकले?
- ओबीसी, दलित समाजाची एकसंधपण बांधणी करण्याकडे नेत्यांचे दुर्लक्ष
- काँग्रेस पक्षबांधणीकडे लक्ष देण्याऐवजी गट-तट वाढविण्यात नेते व्यस्त.
- गावपातळीवर पक्ष बांधणीकडे दुर्लक्ष.
- अंतर्गत वादात मतदारापर्यंत पोहोचण्यात यश.
- भाजपविरोधात भूमिका मांडण्याऐवजी एकमेकांवर टीकास्त्रात व्यस्त.
- निवडणुका आल्यानंतरच कार्यकर्त्यांची नेत्यांना आठवण.