जत : विनापरवाना गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे बाळगून दहशत निर्माण केल्याच्या आरोपावरून अविनाश शिवाजी लवटे (वय ४२, रा. जत, शिवाजी पेठ) यास आज (सोमवारी) सांगली येथील गुंडाविरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई दुपारी अडीचच्या दरम्यान मोरे कॉलनी येथील हॉटेल संभाजी पॅलेसजवळ करण्यात आली. लवटेकडून पिस्तूल, सुरीसह दुचाकी जप्त केली आहे.अविनाश लवटे याच्याकडे विनापरवाना गावठी पिस्तूल (कट्टा) व जिवंत काडतुसे असून, तो जत शहरात दहशत निर्माण करत आहे, अशी माहिती गुंडाविरोधी पथकाला खबऱ्यांकडून मिळाल्यानंतर त्यांनी आज दुपारी छापा टाकून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व एक दुचाकी (एमएच ४५ के ३०२) जप्त करून सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लवटे याला अटक करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप बुवा, कर्मचारी भूषण पाटील, सुनील भिसे आदी सहभागी झाले होते. पुढील तपास जत पोलीस करत आहेत. जिल्ह्यात अनेक गुन्हेगारांकडे घातक शस्त्रे आहेत. त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)
गावठी पिस्तुलासह एकजण अटकेत
By admin | Published: July 15, 2014 12:53 AM