इस्लामपूर : उत्तर प्रदेशमधून फर्निचरच्या कामानिमित्त इस्लामपुरात आलेल्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी मुरादअली मुहब्बत हासमी (२१, रा. श्री दत्तगंज, ता. बलरामपूर, उत्तर प्रदेश) यास न्यायाधीश एस. एम. चंदगडे यांनी २० वर्षे सश्रम कारावास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पीडित मुलगी दोन महिन्यांची गर्भवती होती. तिला नुकसानभरपाई देण्याबाबत न्यायालयाने समाजकल्याण अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
पीडित मुलीचे वडील कामानिमित्त दोन वर्षापूर्वी इस्लामपुरात आले होते. आरोपी मुरादअली हा त्यांच्याकडे कामास होता. त्यातून त्याची १५ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. नोव्हेंबर २०१८ पासून ताे लग्नाच्या आमिषाने पीडित मुलीवर बलात्कार करत होता. हा प्रकार डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू होता. त्यातून पीडित मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिली. ही घटना कोणाला सांगितलीस तर तुझी बदनामी करणार, अशी धमकी मुरादअलीने पीडितेस दिली. नंतर काम संपल्याने मुरादअली गावी गेला. १७ मार्च २०१८ रोजी मुलीस ताप आला. तपासणीदरम्यान ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हा प्रकार मुलीने कुटुंबियांना सांगितला. त्याचदिवशी पोलिसात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक कोमल पोवार यांनी तपास केला. खटल्यात सरकार पक्षाने ८ साक्षीदार तपासले. पीडित मुलगी, तपास अधिकारी व इतर साक्षी ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीस कलम ३७६ (३) नुसार २० वर्षे सश्रम कारावास, १ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास १ महिना साधा कारावास. पोक्सो कलम ८ व कलम १२ नुसार प्रत्येकी ३ वर्षे सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, दंड न दिल्यास १५ दिवस साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा त्याने एकत्रितपणे भोगावयाच्या आहेत. पीडित मुलीच्यावतीने सहायक जिल्हा सरकारी वकील शुभांगी विक्रम पाटील यांनी काम पाहिले.
पुरावा विरोधात..!
या खटल्यात डीएनए चाचणीचा महत्त्वाचा पुरावा विरोधात गेला होता. मात्र शुभांगी पाटील यांनी अशा समाजविघातक कृत्यांना आळा बसण्यासाठी आरोपीस जास्तीत-जास्त शिक्षा द्यावी, असा जोरदार युक्तिवाद केला. मुलीनेही आरोपीस न्यायालयात ओळखून त्यानेच अत्याचार केल्याचा जबाब धीटपणे नोंदवला. या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने आरोपीस कारागृहाची वाट दाखवली.
फोटो : ०५ मुरादअली हासमी